Breaking News

नवे वर्ष, नवा उत्साह!

समाधान पाटील, पनवेल-

कालचक्र कधी थांबत नसते. ते अविरतपणे सुरूच असते. असे असले तरी हल्लीच्या गतिमान युगात दिवस, महिने, वर्षे कशी भर भर पुढे सरकत आहेत. आता हेच बघा ना मागील वर्ष हा हा म्हणता सरून नवे वर्ष कधी सुरू झाले ते कळलेदेखील नाही. नव्या वर्षाची दिनदर्शिका घरच्या भिंतीवर लटकू लागली असून यंदा कधी, काय करायचे यावर आतापासूनच विचारमंथन केले जाऊ लागले आहे.

नवे वर्ष म्हटले की नवे संकल्प ओघानेच आले. अनेक जण वर्षारंभी वेगवेगळे संकल्प करीत असतात. कुणी व्यायामाचा करतो, तर कुणी वाचनाचा, कुणी बचतीचा, तर कुणी व्यसनमुक्तीचा. अगदी वृक्षारोपण, समाजसेवा यांचेही संकल्प केले जातात. त्यासाठी स्वतंत्र वेळापत्रक आखले जाते. सुरुवातीला त्याचे काटेकोरपणे पालन केले जाते, मात्र नव्याची नवलाई नऊ दिवस या प्रमाणे केलेला संकल्प बर्‍याचदा अर्धवट राहतो. फार कमी लोक तो सिद्धीस नेतात. मानसशास्त्रानुसार कोणतीही गोष्ट सलग 21 दिवस करीत राहिल्यास त्याची आपल्याला सवय लागते. खरंतर आपापल्या आवडीनिवडीनुसार कोणताही निश्चय करा, पण तो पूर्ण करण्यासाठी त्याला ध्येय मानून प्रयत्न करायला हवा. मुख्य म्हणजे एकदम शेवटचे टोक गाठण्याचा विचार न करता त्या दिशेने एक एक पाऊल टाकल्यास हळूहळू ध्येयापर्यंत पोहचता येऊ शकते.

वैश्विक महामारी कोरोनाच्या दोन वर्षांनंतर सरते वर्ष कसे भुर्रकन निघून गेले. कोविड काळात सारे काही ठप्प झाले होते. त्यामुळे सर्वत्र ’बंद’सारखे चित्र पहावयास मिळत असे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यावर निर्बंध उठले आणि जनजीवन पूर्वपदावर आले. खासकरून सण-उत्सव पूर्वीप्रमाणे उत्साहात साजरे होऊ झाले. त्यामुळे आनंदाला उधाण आले. त्यात वेळही पटकन गेला. आता पुन्हा एकदा चीनसह अन्य काही देशांमध्ये कोरोना डोके वर काढू लागल्याचे वृत्त आहे. हे कोरोनारूपी भूत मानवाच्या मानगुटीवर उतरण्याचे काही नाव घेत नाहीये. कोरोना संकट अचानक येते आणि मध्येच जाते. सर्व काही सुरळीत झाले की पुन्हा कोरोना कसा काय वाढू लागतो हे अनाकलनीय आहे. खरंच तो आहे की त्याचा बागूलबुवा केला जातोय?

आणखी एक नमूद करण्यासारखी बाब म्हणजे प्रसारमाध्यमांनी विशेषतः चोवीस तास सुरू असणार्‍या वृत्तवाहिन्यांनी नकारात्मक बातम्या प्रसारित न करता या संदर्भात शासकीय पातळीवर जे काही निर्णय, उपाययोजना होत असतात ते दाखविण्यास प्राधान्य दिले पाहिजे. नाहीतर अनेक वाहिन्या सनसनाटी बातम्या दाखवण्याच्या नादात कोरोनाचे भय पसरवितात. उरलीसुरली कसर सोशल मीडियातून भरून निघते. फरक फक्त एवढाच आहे की सोशल मीडियात दोन्ही बाजूंनी मते व्यक्त करता येतात. कोरोनाचा पूर्वानुभव पाहता कोविड विषाणूच काय पण इतर कोणातही रोग, साथ पसरू नये याकरिता प्रत्येकाने नियम पाळून काळजी घेतली पाहिजे हेही तितकेच खरे!

भले बुरे ते घडून गेले असे म्हणत सर्वांनी सरत्या वर्षाला निरोप देऊन जीवनगाणे नव्याने सुरू केले आहे. आयुष्यात सुख-दुःख अनुभवतच पुढे जावे लागते. अशावेळी आपुलकीचा आधार महत्त्वाचा ठरतो, कारण माणूस हा समाजशील प्राणी आहे. एकमेकांच्या सोबतीने मार्गक्रमण केल्यास प्रवास कसा सुकर व सुखकर होतो. नव्या युगात माणूस नेमके हेच तो विसरलाय आणि मी व माझे कुटुंब यात गुरफटलाय. स्वतःसह परिवाराचा विचार करणे यात काही गैर नाही, परंतु त्याचबरोबर इतरांसाठीसुद्धा काही करता आले तर त्याहून दुसरा मोठा आनंद नाही. म्हणूनच केवळ स्वतःपुरते मर्यादित न राहता समाजासाठी काही तरी योगदान दिले पाहिजे. त्याचवेळी आप्त, मित्रमंडळी यांनाही जपले पाहिजे. असं म्हणतात की, दुसर्‍याच्या दारात एखादे झाड लावले तर त्याची फुले आपल्याच दारात पडतात…

दैनंदिन कामकाजासाठी अनुसरल्या जाणार्‍या नव्या इंग्रजी वर्षाला प्रारंभ झाला असताना त्याचे स्वागतही नव्या उत्साहाने करण्यात येत आहे. चालू वर्ष उमेदीचे, आशा-आकांक्षा पूर्ण करणारे अन् आरोग्यदायी असावे अशीच प्रत्येकाची मनीषा असेल. मंडळी, जर काही साध्य करायचे असेल तर त्यासाठी परिश्रम घेणे आवश्यक असते. कष्टाला पर्याय आणि यशाला शॉर्टकट नसतो. समर्थ रामदासस्वामींच्या उक्तीनुसार कष्टाविना फळ नाही तसेच जर कष्ट न करता सहजासहजी काही मिळाले की त्याचे मोल नसते. म्हणून सर्वप्रथम आपण स्वतः आपल्या कामावर प्रेम केले पाहिजे. आपले काम आपल्याला आवडले तर ते इतरांनाही नक्कीच आवडेल. झोकून देत काम करून यशाची अनुभूती घेण्याचा आनंद अवर्णनीय असतो. त्यासाठी सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply