Breaking News

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेला प्रारंभ

पनवेल ः रामप्रहर वृत्त

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मानाच्या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला शुक्रवारपासून (दि. 5) पुणे येथील केंद्रातून प्राथमिक फेरीच्या उद्घाटनाने प्रारंभ झाला. रामकृष्ण मोरे सभागृहात झालेल्या या प्राथमिक फेरीचे भाजपचे सांस्कृतिक सेलचे प्रदेशाध्यक्ष शैलेश गोजमगुंडे व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सांस्कृतिक सेलचे प्रदेश सहसंयोजक उमेश धनसाली, दिग्दर्शक, अभिनेते व लेखक दीपक पवार, लेखक व अभिनेते राहुल वैद्य, तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे प्रमुख कार्यवाह श्यामनाथ पुंडे, खजिनदार अमोल खेर, सांस्कृतिक सेलचे रायगड जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, सहसंयोजक गणेश जगताप, चिन्मय समेळ यांच्यासह कलावंत उपस्थित होते. नाट्य चळवळ वद्धींगत करण्यासाठी व नाटय रसिकांना आपले नाटयाविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वद्धींगत व्हावा, यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे माजी सभागृहनेते व नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी ‘अटल करंडक एकांकीका’ या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. नामवंत, उमदे आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होतात. स्पर्धेचे देखणे व निटनेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परिक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ यामुळे ही स्पर्धा नाट्य रसिकांच्या गळयातील ताईत बनली. दरवर्षी या स्पर्धेला राज्यातील कलाकार आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत असतो. त्यामुळे हि स्पर्धा राज्यात नावाजली असून उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या स्पर्धकांना यंदाही भरघोस रक्कमेची पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला शुक्रवारपासून विभागनिहाय प्रारंभ झाला आहे. त्यानुसार पुणे केंद्रावर 4 व 5 नोव्हेंबर, सातारा केंद्र 6 नोव्हेंबर, रत्नागिरी 8 नोव्हेंबर, जळगाव केंद्र 12 नोव्हेंबर, नाशिक 13 नोव्हेंबर, रायगड (पनवेल) 19 व 20 नोव्हेंबर, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली केंद्रांची प्राथमिक फेरी 24 ते 27 नोव्हेंबर रोजी होणार आहे, तर अंतिम फेरी 2 ते 4 डिसेंबर रोजी पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे. या स्पर्धेचे प्रायोजक ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि. तर सहप्रायोजक नील ग्रुप आहे. अंतिम फेरीतील विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक, द्वितीय क्रमांकास 50 हजार रुपये प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक 25 हजार रुपये प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक 10 हजार रुपये प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ एकूण दोन बक्षिसे प्रत्येकी पाच हजार रुपये प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह असे बक्षिसांचे स्वरूप असून सर्वोत्कृष्ट अभिनेता (वैयक्तिक), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (वैयक्तिक), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (वैयक्तिक), सर्वोत्कृष्ट लेखक (वैयक्तिक), सर्वोत्कृष्ट संगीत (वैयक्तिक), सर्वोत्कृष्ट नेपथ्य (वैयक्तिक), सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना (वैयक्तिक), तसेच रायगड जिल्हा प्राथमिक फेरीतील प्रथम क्रमांक 10 हजार रुपये प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक सहा हजार रुपये प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक चार हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह त्याचबरोबर अंतिम फेरीकरिता सर्वोत्कृष्ट विनोदी एकांकिका, महाराष्ट्रातील अस्सल मायबोली एकांकिका, लोककलेवर आधारित एकांकिका, सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार व बाल कलाकार यांनाही विशेष पारितोषिकांनी सन्मानित करण्यात येणार आहे.

नाट्य चळवळ वृद्धींगत करण्याचा प्रयत्न…

नाट्य चळवळ वृद्धींगत करण्यासाठी तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वद्धींगत व्हावा, यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे माजी सभागृह नेते व नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी अटल करंडक एकांकीका या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply