भारत आणि इंग्लंड भिडणार
अॅडलेड : वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीचा दुसरा सामना गुरुवारी (दि. 10) भारत आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये होणार आहे. दोन्ही संघ फॉर्ममध्ये असल्याने हा सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे.
भारताने या वर्ल्डकपमध्ये सुपर-12 फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभव वगळता सर्व सामने जिंकले आहेत. भारताचे फलंदाज विशेषतः विराट कोहली, सूर्यकुमार यादवची कामगिरी शानदार राहिली आहे. दुसरीकडे इंग्लिश संघही डकवर्थ लुईसच्या नियमानुसार आयर्लंडविरुद्ध एकमेव लढत हरला. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर, अॅलेक्स हेल हे फलंदाज भरात आहेत, पण इंग्लंडचा स्टार फलंदाज डेव्हिड मलान आणि स्टार वेगवान गोलंदाज मार्क वूड यांच्या तंदुरुस्तीबाबत शंका आहेत. हे दोन्ही खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यास ते उपांत्य फेरीतून बाहेर पडू शकतात, तर भारताचा कर्णधार रोहित शर्मा यष्टीरक्षक फलंदाज म्हणून दिनेश कार्तिकला अनुभवतो की ऋषभ पंतला संधी देतो हे पाहण्यासारखे असेल.
…तर भारत-पाक महामुकाबला
टी-20 विश्वचषकातील उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव केला आहे. आता गुरुवारी होणार्या दुसर्या उपांत्य लढतीमधील भारत आणि इंग्लंड यांच्यातील विजयी संघ अंतिम फेरीत पाकिस्तानविरोधात विजेतेपदासाठी झुंजेल. भारतीय संघाने दुसरी सेमीफायनल जिंकली तर भारत आणि पाकिस्तान या कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये महामुकाबला होईल, जो दर्शकांसाठी पर्वणी असेल. विशेष म्हणजे या स्पर्धेत भारताने आपल्या सलामीच्याच लढतीत पाकिस्तानचा पराभव केला होता.