पनवेल ः प्रतिनिधी
सिडकोमार्फत पाणीपुरवठा होत असलेल्या नवीन पनवेलमध्ये पुन्हा कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे या विभागातील रहिवाशांना पाण्याअभावी त्रास सहन करावा लागत आहे. या विभागातील पाणीपुरवठा नियमित व योग्य दाबाने करण्यात यावा अन्यथा पुन्हा आंदोलन करावे लागेल, असा इशारा भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. मनोज भुजबळ यांनी दिला आहे
सिडकोच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या पत्रात त्यांनी नमूद केले आहे, नवीन पनवेलमध्ये सिडकोमार्फत पाणी पुरवठा केला जातो, परंतु मागील आठ ते 10 दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे व त्यामुळे रहिवाशांना पाण्याअभावी त्रास सहन करावा लागत आहे. बाहेर प्रचंड प्रमाणात पाऊस पडत आहे, परंतु घरात नळाला पिण्याचे पाणी नाही व पाणी बिल मात्र भरावे लागत आहे. त्यामुळे लोकांमध्ये सिडकोविरुद्ध प्रचंड संताप निर्माण झाला आहे. याबाबत वेळोवेळी मोर्चे काढून, निवेदने देण्यात आली, तरीही सिडको प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने पाणीपुरवठा नियमित करावा अन्यथा आठ दिवसांत पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अॅड. मनोज भुजबळ यांनी दिला आहे.