पंतप्रधान मोदींनी तोफ डागली
कांगडा (हिमाचल प्रदेश) : वृत्तसंस्था
काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार, काँग्रेस म्हणजे विकासातील अडथळा. असे सरकार कधीच विकास करू शकणार नाही, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (दि. 9) केली. ते हिमाचल प्रदेशच्या कांगडा येथील चंबी मैदानात आयोजित निवडणूक सभेत बोलत होते. या वेळी त्यांनी भाजपच्या ‘डबल इंजिन सरकार’चे कौतुक करण्यासोबतच काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
आता काँग्रेसचे सरकार फक्त दोन राज्यांमध्ये उरले आहे. काँग्रेस जिथून जाते तिथे त्यांना सत्तेत परतणे कठीण आहे, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगावला. यासोबतच काँग्रेसने आतापर्यंत केवळ लुटमारीचे काम केले, तर भारतीय जनता पक्षाने कामावर लक्ष केंद्रित करून विकास साधला, असे त्यांनी नमूद केले.
काँग्रेस हिमाचलला स्थिर सरकार कधीच देऊ शकत नाही आणि देऊ इच्छित नाही. काँग्रेसच्या राज्यातून कधी विकासाच्या बातम्या येतात का? फक्त भांडणाच्या बातम्या येतात. काँग्रेस म्हणजे अस्थिरतेची हमी, भ्रष्टाचार, घोटाळ्याची हमी आणि विकासकामांमध्ये अडथळे आणण्याची हमी, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
उत्तराखंडच्या जनतेने जुनी परंपरा बदलून भाजपला विजय मिळवून दिला. उत्तर प्रदेशातही 40 वर्षांनंतर एखादा पक्ष सलग दुसर्यांदा सत्तेत आला. मणिपूरमध्येही पुन्हा भाजपचे सरकार आले आहे. अशी राजकीय परंपरा निर्माण करायची आहे की, मतदार आम्हाला पुन्हा पुन्हा संधी देतील. म्हणूनच आम्ही विकासासाठी आणि देशासाठी काम करीत आहोत, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. या वेळी त्यांनी भाजप सरकारने राबविलेल्या योजनांची माहिती दिली.