Breaking News

तरुणांनी ग्रामस्थांच्या साथीने बांधले वनराई बंधारे

कर्जतच्या आषाणेमध्ये श्रमदान; जनावरांची तहान भागणार

कर्जत : प्रतिनिधी
एकमेकांना अडवून परस्परांची जिरविण्याऐवजी कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायत हद्दीमधील आषाणे येथील तरुणांनी ग्रामस्थांच्या मदतीने लोकवर्गणी काढून ओहोळात तीन वनराई बंधारे बांधले. त्यासाठी सर्वांनी श्रमदानही केले.
कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायत हद्दीमध्ये आषाणे गावाच्या मागे मोठा डोंगर असून त्या डोंगरातील पाणी पावसाळ्यात खाली वाहून येत असते. या पाण्याच्या मार्गात असलेल्या ओहोळात उन्हाळ्यात थेंबभरदेखील पाणी शिल्लक नसते. त्यामुळे आषाणे आणि उमरोली या गावांमधील शेतकर्‍यांच्या जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. ही समस्या दूर करण्यासाठी आषाणे गावातील तरुणांनी एकत्र येत स्थानिक ग्रामस्थांना मदतीला घेत लोकवर्गणी गोळा केली. त्या लोकवर्गणीला तरुणांनी श्रमदानाची जोड दिली आणि एका दिवसात तब्बल तीन ठिकाणी वनराई बंधारे बांधून उन्हळ्यात कोरड्या राहणार्‍या ओहोळात पाण्याचा साठा निर्माण केला आहे. ओहोळातील पाणी साठण्याची क्षमता असलेल्या जागी मातीच्या पिशव्या भरून वनराई बंधारे बांधण्यात आले. मुक्या जनावरांसाठी पूर्ण उन्हाळाभर पाणी साठून राहावे यासाठी श्रमदान करण्यात आले. गावातील सर्व ज्येष्ठ ग्रामस्थ आणि तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रमदान करीत हे तीन वनराई बंधारे बांधण्यात आले. आषाणे गावातील तरुणांच्या या कामाबद्दल ग्रामस्थांनी कौतुक केले असून पुढील वर्षी पावसाळा संपताच बंधारे बांधण्याचे नियोजन ग्रामस्थांनी बोलून दाखवले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply