कळंबोली : प्रतिनिधी
तळोजा वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक महेश पाटील व त्यांच्या सहकार्यांनी आंबेघर गाव आदिवासीवाडी तळोजा, कातरवाडी तळोजा फेज 2 येथे नवी मुंबई वाहतूक पोलीस उपायुक्त व सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत व लॉकडाऊनमुळे बंद पडलेले व्यवसायामुळे गरीब, रोजंदारीवरील लोकांचे अत्यंत हलाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंग यांच्या संकल्पनेतून तसेच सहपोलीस आयुक्त डॉ. जय जाधव, नवी मुंबई वाहतूक पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
नेहमी पोलीस बांधव लॉकडाऊनमध्ये नाक्या नाक्यावर उभे राहून फटकवतानाच असतात असा समज असतो, मात्र नवी मुंबई पोलीस व वाहतूक पोलिसांनी सध्या ही समज मोडीत काढलेली आहे. या वेळी गरजूंना गव्हाचे पीठ, तांदूळ, साखर, तेल, तुरदाळ, मुगडाळ, मसूरडाळ, काबुली चना इत्यादी जीवनाश्यक वस्तू मदत स्वरूपात देण्यात आल्या. जेणेकरून वाढलेल्या लॉकडाऊनमधील उदरनिर्वाहाची त्यांना चिंता राहणार नाही. पोलीस बांधवांनी केलेल्या या मदतीनंतर गरजू आदिवासी नागरिकांच्या चेहर्यावर समाधान पाहावयास मिळाले.