Breaking News

अधिकार्‍यांना पाजले गढूळ अन् खारे पाणी

पेण प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलनकर्त्या महिला आक्रमक

पाली, पेण : प्रतिनिधी

शुद्ध व मुबलक पाणी मिळावे या मागणीसाठी भारतीय महिला फेडरेशन व खारेपाट विभागाच्या माध्यमातून गुरुवारी (दि. 21) पेण तालुक्यातील ग्रामस्थांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. या वेळी संतप्त आंदोलकांनी उपस्थित अधिकार्‍यांना गढूळ व खारे पाणी पाजले.

पेण विभागात भरपूर पाऊस पडतो तसेच तालुक्यात हेटवणे, शाहपाडा, बाळगंगा इत्यादी धरणे व जलस्त्रोत आहेत. परंतु तालुक्यातील पाणीटंचाईचा प्रश्न गेली वीस-पंचवीस वर्षे कायम आहे. तालुक्यातील अनेक गावे व वाड्या, वस्त्यांत सद्यस्थितीत पाण्याची भीषण टंचाई आहे. हंडाभर पाण्यासाठी महिला रखरखत्या उन्हात वणवण भटकत आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या खारेपाट विभागातील ग्रामस्थांनी शुद्ध व मुबलक पाणी मिळावे या मागणीसाठी भारतीय महिला फेडरेशनच्या माध्यमातून गुरूवारी पेण प्रांताधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. या वेळी संतप्त आंदोलकांनी अधिकार्‍यांना गढूळ व खारे पाणी पाजले. तुम्ही एक दिवस हे पाणी पिऊ शकत नाही, आम्ही वर्षाचे 12 महिने हे पाणी पितो, आम्ही गुरे ढोरे आहोत का? असा सवाल या वेळी महिलांनी उपस्थित केला.

येथील रखडलेले पाणी प्रकल्प पूर्ण करावेत. हेटवणे ते शाहपाडा वाढीव पाणी प्रकल्प, दक्षिण शाहपाडा कालवा, डावातीर कालवा, बाणगंगा पाणी प्रकल्प त्वरित पूर्ण करावेत. कालवे, धरणांतील व इतर पाणीसाठ्यातील गाळ काढवा,  सिडको किंवा जेएसडब्ल्यू असे पाण्याचे कंपनीकरण थांबवून महाराष्ट्र शासन तसेच जीवन प्राधिकरणांकडे सर्व पाण्याचे नियोजन द्यावे, आदि मागण्या या वेळी करण्यात आल्या.

पाणी प्रश्नावर यापूर्वी 2 मार्च 2022 रोजी पाणी महिलांनी आंदोलन केले. त्या वेळी झालेल्या बैठकीतील चर्चेनुसार 31 मार्च ते 15 एप्रिलपर्यंत कामे होतील असे सांगण्यात आले होते. 25 मार्च रोजी 150 महिलांच्या सह्यांचे स्मरणपत्राद्वारे पाणी प्रश्नासंदर्भात पाठपुरावा केला होता. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी प्रकल्पाबाबत सुरू असलेल्या कामाची माहिती मिळावी या मागणी बरोबरच सध्या जो काही अपुरा पाणीपुरवठा होत आहे तो किमान शुध्द मिळावा, अशी विनंती करण्यात आली होती. त्यास प्रशासनाकड़ून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. स्थानिक प्रशासनाकडून आमच्या मागण्या पूर्ण होत नसतील तर मंत्रालयावर धडक मारण्याची आम्ही तयारी ठेवली असल्याचे मोहिनी गोरे यांनी सांगितले.

सामाजिक कार्यकर्त्या मोहिनी गोरे, मनसेचे युवा नेते संदीप ठाकूर, विजयभाऊ पाटील, दिलीप पाटील, किरण म्हात्रे, माधुरी ठाकूर, देवेंद्र कोळी, हेमंत पाटील, साक्षी पाटील, अपर्णा म्हात्रे, सुषमा पाटील, रंजिता ठाकूर, चंद्रकांत म्हात्रे आदींसह खारेपाट विभागातील महिला व ग्रामस्थ या ठिय्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दरम्यान, मागणीनुसार जास्तीतजास्त टँकर खारेपाट विभागासाठी देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन पेणचे गटविकास अधिकारी एम. एन. गडरी यांनी मोहिनी गोरे यांना दूरध्वनीवरून दिले.

पाणीपुरवठ्याबाबत दर 15 दिवसांनी संबंधित अधिकार्‍यांसोबत आढावा बैठक घेत असून, टँकरची संख्या वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाणीपुरवठा लवकरात लवकर कसा सुरळीत होईल, यासाठी प्रयत्नशील आहे. पाइपलाइनचे कामही पूर्णत्वाकडे आहे. – विठ्ठल इनामदार, प्रांताधिकारी, पेण

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply