Breaking News

‘दिबां’च्या प्रतिमेचे नवी मुंबई महापालिकेने पूजन करावे

विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांची मागणी
नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबई महापालिका अनेक युगपुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करुन त्यांच्या कार्याला उजाळा देवून नव्या पिढीला प्रेरणा देण्याचे कार्य करीत आहे. त्यानुसार लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जयंतीनिमित्त (13 जानेवारी) महापालिकेने ‘दिबां’च्या प्रतिमेचे पूजन करावे, अशी मागणी पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी आयुक्तांकडे केली आहे.
महाराष्ट्र सरकारने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचे दोन्ही सभागृहात ठराव मंजूर केलेले आहेत. नवी मुंबई महापालिका ही भूमिपुत्रांनी त्याग केलेल्या जमीनीवर स्थापित झाली आहे. दि. बा. पाटील साहेब हे आमच्या भूमिपुत्रांचे आराध्य दैवत आहेत. भूमिपुत्रांचे पुर्नवसन आणि पूर्णविकासबाबत अनेक समस्या आजही प्रलंबित आहेत. आम्ही सर्व भूमिपुत्र हे संघटीत आहोत म्हणूनच विविध हक्कांसाठीच्या संघर्ष करण्यासाठी लोकनेते दि. बा. पाटील साहेब यांच्यामुळे आम्हांला कायमच ऊर्जा प्राप्त होत असते. त्यामुळे पालिकेने लोकनेते दि. बा. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन त्यांच्या जयंती दिनी करावे, अशी मागणी भगत यांनी केली आहे.
दि. बा. हे देशातील शेतकर्‍यांचे नेते होते. त्यांनी कूळ कायद्यासाठी संघर्ष केला, शेतकर्‍यांच्या अनेक समस्यांबाबत अजरामर असे लढे दिले. राज्याचा प्रश्न म्हणून संयुक्त महाराष्ट्र लढ्यात समर्पित आणि बेळगाव सीमा प्रश्नी एक वर्षे कारावास, स्रीभ्रूण हत्याबाबत जनजागृती, विविध प्रकल्पांसाठी संपादित केलेल्या जमिनींच्या बदल्यात परत विकसीत जमीन मिळवून देण्याचा महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी कायदा केला, अंधश्रद्धा निर्मूलनासह शैक्षणिक क्षेत्रासाठीदेखील भरीव कार्य केलेले आहे, अशी अनेक महान कार्ये देश, राज्य आणि जिल्हास्तरावर केलेली आहेत. लोकशाहीतील घटनात्मक अश्या खासदार, आमदार, राज्याच्या विधानमंडळाचे विरोधी पक्षनेते या पदांवर समर्पित कार्य केलेले आहे.
‘दिबां’नी आयुष्यभर त्याग्य जीवन व्यथित करून जनतेच्या कल्याणाकरीता संघर्ष केलेला आहे. ‘दिबां’नीवरील प्राप्त विविध घटनात्मक पदांचा वापर स्व व स्वार्थ यासाठी कधीही केला नाही. ते त्यांचं संपूर्ण जीवन राजकीय व सामाजिक असे निष्कलंक आयुष्यात जगले. अभिमानाने सांगायचे तर ‘दिबां’नी त्यांच्या हयातीत व त्यांच्या पश्चात देशातील गोरगरीब शेतकर्‍यांना शैक्षणिक आर्थिक व सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली.
लोकनेते दि. बा. पाटील साहेब यांच्या कार्याचे स्मरण होण्यासाठी आणि त्या अतुल्य कार्यांपासून अनेक वंचित, बाधित आणि उपेक्षित कष्टकर्‍यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तसेच त्यांच्या राज्यात व देशात सुरू असलेल्या वा होणार्‍या आंदोलनातील आंदोलकांना अखंड ऊर्जा प्राप्तीसाठी प्रेरणा म्हणून आपल्या प्रशासनाच्या माध्यमातून प्रतिवर्षी 13 जानेवारी रोजी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जयंतीनिमित्त स्मरण व ऊर्जा म्हणून प्रतिमेचे पूजन करण्यात यावे, अशी मागणी भगत यांनी केली आहे.

 

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply