मुंबई ः प्रतिनिधी
दुष्काळात होरपळत असलेल्या व पाणीटंचाईने ग्रासलेल्या देशवासीयांच्या चिंतेत भर घालणारा अंदाज नुकताच हवामान विभागाने वर्तवला आहे़. मान्सून यंदा पाच दिवस उशिरा म्हणजे 6 जून रोजी केरळात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे़. ‘स्कायमेट’ने यापूर्वी मान्सूनचे आगमन 4 जून रोजी होईल, असा अंदाज व्यक्त केला होता़. मान्सून मॉडेलनुसार त्यात चार दिवस पुढे-मागे होण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे़.
30 मे ते 1 जून ही केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची तारीख गृहीत धरली जाते़. अल-निनोचा प्रभाव असल्याने यंदा मान्सूनवर परिणाम होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता़. हवामान विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या अंदाजातून ते प्रतित होते़. याअगोदर हवामान विभागाने यंदा सरासरीच्या 96 टक्के पावसाचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला आहे़.
मान्सूनबद्दलचे 14 वर्षांतील 13 अंदाज खरे ठरल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे़. केवळ 2015मध्ये अंदाज चुकला. 2015मध्ये हवामान विभागाने 30 मे रोजी मान्सून केरळमध्ये येईल, असा अंदाज व्यक्त केला होता, मात्र मान्सून 5 जून रोजी केरळमध्ये दाखल झाला होता़.
केरळमधील मान्सूनच्या आगमनाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी हवामान विभागाकडून सहा घटकांचा विचार केला जातो. उत्तर-पश्चिम भारतातील किमान तापमान, दक्षिण द्वीपसमूह, दक्षिण भारतातील पूर्व मान्सून पाऊस, दक्षिण चीन सागरावरील उष्णतेचे होणारे उत्सर्जन, दक्षिण पूर्व भारतीय महासागरावरील वार्यांची दिशा, पूर्वेकडील भूमध्य सागरीय भागावरील उष्णतेचे होणारे उत्सर्जन, दक्षिण-पश्चिम पॅसिफिक क्षेत्रावरील उष्णतेचे होणारे उत्सर्जन याचा विचार करून केरळमध्ये मान्सून कधी येणार याचा अंदाज जाहीर केला जातो़.
केरळमध्ये मान्सून दाखल होण्यापूर्वी जवळपास 15 दिवस अगोदर त्याचे अंदमानच्या समुद्रात आगमन होत असते़. दरवर्षी साधारण 15 ते 16 मेदरम्यान मान्सूनचे आगमन अंदमानच्या समुद्राजवळ होत असते, यंदा मात्र अंदमानच्या समुद्रातील काही भाग निकोबार बेट आणि परिसरात 18-19 मे रोजी मान्सून दाखल होण्याच्या दृष्टीने अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे़.
मागील पाच वर्षांतील केरळमधील मान्सूनचे आगमन अनुक्रमे… वर्ष-आगमन-अंदाज
2014-6 जून-5 जून, 2015-5 जून-30 मे, 2016-8 जून-7 जून, 2017-30 मे-30 मे, 2018-29 मे-29 मे, 2019-???-6 जून