मुंबई ः प्रतिनिधी
तंत्रज्ञानाचा वापर करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘संवाद सेतू’ उपक्रमातून मागील सहा दिवसांत 22 जिल्ह्यांतील तब्बल 27 हजार 449 लोकप्रतिनिधी-अधिकार्यांशी थेट संवाद साधून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. लोकप्रतिनिधींच्या अडचणी जाणून घेत त्यावर प्रशासनाला कार्यवाहीचे निर्देश देण्याचे कामही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केले.
मागील सहा दिवस ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून 22 जिल्ह्यांतील 139 तालुक्यांपर्यंत मुख्यमंत्र्यांना पोहचता आले. या 22 जिल्ह्यांत औरंगाबाद, नांदेड, जालना, उस्मानाबाद, बीड, परभणी, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, बुलडाणा, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, हिंगोली, वर्धा, नागपूर, वाशीम यांचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्रपणे हा संवाद सेतू उपक्रम आयोजित करण्यात आला. ऑडिओ ब्रिज या आधुनिक तंत्रामुळे एकाच वेळी संपूर्ण जिल्ह्यातील संबंधित यंत्रणेशी संवाद साधणे शक्य होत असल्याने कमी कालावधीत इतक्या व्यापक प्रमाणावर संपर्क साधून जलदगतीने दुष्काळ निवारणाच्या कामांचा आढावा घेणे शक्य
झाले आहे.
या उपक्रमात मुख्यमंत्री प्रत्यक्ष सरपंचांशी संवाद साधताना त्यांच्यासोबत राज्याचे मुख्य सचिव, दुष्काळी उपाययोजनांशी संबंधित खात्यांचे प्रधान सचिव आदी अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, ग्रामसेवक हे सर्व ऑडिओ ब्रिजवर उपलब्ध असत. अनेक पालक सचिवांनीही संबंधित जिल्ह्यांतून या आढाव्यात सहभाग नोंदवला. त्यामुळे संबंधित सरपंचांनी मांडलेली तक्रार एकाच वेळी मुख्यमंत्री, मुख्य सचिव, पालक सचिव आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी ऐकू शकत होते. या तक्रारींवर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ दिलेले निर्देशही त्याच वेळी प्रत्यक्ष सरपंचांपर्यंतही पोहचत होते.
या उपक्रमातून 884 सरपंचांनी थेट मुख्यमंत्र्यांशी बोलून आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. ज्यांना संवादात सहभागी होता आले नाही, त्यांच्यासाठी विविध व्हॉट्सअॅप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले. या 22 जिल्ह्यांना एकूण 17 व्हॉट्सअॅप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून 13 मेपर्यंत सुमारे 4451 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यातील 2359 तक्रारी प्रत्यक्ष दुष्काळाशी संबंधित होत्या.