Breaking News

खारघरमधील तरुण प्राचीन भाषेच्या प्रेमात

खारघर : प्रतिनिधी

प्राचीन इजिप्तची संस्कृती नेहमी लोकांना गूढ वाटत आली आहे. इजिप्तप्रमाणे तितकीच प्राचीन असलेली सुमेरियन संस्कृती जी आजच्या इराक – सीरिया परिसरात साधारण 4500 वर्षांपूर्वी विकसित झाली होती आणि जिच्यासोबत आपल्या सिंधू-संस्कृती म्हणजेच हडप्पन संस्कृतीचा व्यापारी संबंध राहिला आहे, यांच्याबाबत निरनिराळ्या माहितीपटांमुळे कुतूहल असते. या दोन्ही अतिप्राचीन भाषा खारघर शहरातील शैलेश क्षीरसागर हा इतिहासाचा अभ्यासक असलेला तरुण शिकत आहे. फावल्या वेळेत क्षीरसागर आपली आवड जोपासण्याचा प्रयत्न करत आहे. इजिप्शियन भाषांतील ओल्ड इजिप्शियन (इसपू 3300 सुमार), मिडल इजिप्शियन (इसपू 2500 ते इसपू 1300 सुमार) आणि लेट इजिप्शियन (इसपू 1300 ते इसपू 700 सुमार) ह्यानंतर ख्रिश्चन धर्म-प्रसारामुळे इजिप्तमध्ये चर्च आल्यानंतर इसवी सनाच्या पहिल्या शतकात लेट इजिप्शियनपासून कॉप्टिक नामक भाषा विकसित झाली, ज्याची लिपी ग्रीकप्रमाणे होती. इजिप्तमधील एका प्राचीन शिलालेखात इराणमधील राजा दारियसच्या राज्यात असलेल्या सिंध प्रांताचा उल्लेख हिंदुश असा आहे, हा तेथील भारताचा थेट उल्लेख आहे. ह्या भाषांच्या अभ्यासामुळे पिरॅमिड्सबाबत तसेच या संस्कृतीबाबत आणि प्राचीन इजिप्तमधील 3000 वर्षांहूनही जुन्या साहित्यातील मनोरंजक कथा वाचून त्यांचे आपल्या भाषांत भाषांतर करणे सहज शक्य होईल. शैलेश क्षीरसागर यांनी यापुर्वी ओल्ड पर्शियन हि भाषादेखील आत्मसात केली आहे. शैलेशच्या या आवडीमागे भारतात या भाषेचा प्रचार व प्रसार हा एक उद्देश आहे.भारतात हाताच्या बोटावर मोजण्या एवढे तरुण ही भाषा शिकत आहेत. आजकाल व्हॉट्सअ‍ॅपच्या काळात या प्राचीन संस्कृतींबाबत अनेक गैर-समज पसरविले जात आहेत. ह्या संस्कृती परग्रहवासीयांनी निर्माण केल्या किंवा इराकमधील प्राचीन सुमेरियन वीरांना भारतातील देवता म्हणून सांगणे अशी चुकीची माहिती लोकांत पसरविली जाऊन लोकांची दिशाभूल केली जात आहे. यामुळे आपल्या लोकांबाबत जागतिक पातळीवर चुकीचा संदेश जातो. हे सर्व थांबविण्यासाठी ह्या लिप्या आणि भाषा अगदी मूळ शिलालेखांतून शिकणे आणि त्याचा खरा अर्थ लोकांना सोप्या भाषांत समजावून सांगणे हा प्रयत्न होणे गरजेचे असल्याने याकरिता शैलेश हि भाषा शिकत आहेत.सध्या प्राचीन इजिप्शियन अमेरिकेतील ऑरिलियो नावाच्या शिक्षकाकडून आणि सुमेरियन भाषा गॅब्रियल ह्या इटालियन शिक्षक- मार्गदर्शकाकडून शिकत आहे. शैलेश यांनी  यशवंतराव चव्हाण विद्यापीठातून इतिहास विषयात पदवी प्राप्त केली आहे. या व्यतिरिक्त मुंबई विद्यापीठातून विभागप्रमुख डॉ. मुग्धा कर्णिक आणि पुरातत्वज्ञ डॉ. कुरुष दलाल ह्यांच्या मार्गदर्शनाखाली पुरातत्व विषयात प्रमाणपत्र आणि ऍडव्हान्स प्रमाणपत्र,सर जेजे इंडो इराणियन इन्स्टिट्यूटमधून अवेस्ता भाषेत शिक्षण आणि अर्मेनियातील प्रो. निशान ह्यांच्याकडे ओल्ड पर्शियनचे शिक्षण घेतले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply