Breaking News

रेल्वे पुलावरील लाद्या उखडल्या; अपघाताची शक्यता

पनवेल ः प्रतिनिधी

पनवेल  रेल्वे स्टेशनवरून  नवीन पनवेलकडे जाण्यासाठी असलेल्या पुलावरील एप्रिल महिन्यात दुसर्‍यांदा नवीन बसवण्यात आलेल्या लाद्या उखडल्या आहेत. त्यामध्ये  गर्दीच्या वेळी पाय अडकून एखादा प्रवासी पडण्याची शक्यता आहे. यामुळे एल्फिन्स्टन स्टेशनसारखी मोठी दुर्घटना घडू शकते याकडे मात्र संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. त्या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.

मध्य रेल्वेचे  पनवेल रेल्वेस्टेशन हे मोठे जंक्शन आहे. येथे क्रमांक 1 ते 4 फलाटावर लोकल गाड्या, तर क्रमांक 5 ते 7वर लांब  पल्ल्याच्या गाड्या येत असतात. फलाट क्रमांक 5 ते 7 हे नवीन पनवेल बाजूला आहेत. पनवेल शहराचा मोठ्या प्रमाणात विकास हा नवीन पनवेल बाजूला झाला आहे. या बाजूला मोठ्या प्रमाणात रहिवासी वसाहती व इंजिनिअरिंग व इतर महाविद्यालये असल्याने प्रवाशांची, विद्यार्थ्यांची जा-ये असते. या बाजूला जाण्यासाठी सहा फूट रुंदीचा पूल आहे. लोकल थांबल्यावर अनेक जण या पुलावर जाण्यासाठी फलाटावरून धावत जात असतात. गर्दीच्या वेळी पुलावर चढणे म्हणजे दिव्यच असते. याच वेळी फलाट क्रमांक 6 किंवा 7 वर लांब पल्ल्याची गाडी आल्यास प्रवाशांची कोंडी होते.

या पुलावरील जुन्या लाद्या काढून नवीन मोठ्या लाद्या मार्च महिन्यात बसवण्यास सुरुवात केली. काम पूर्ण होत आले असताना त्यांचे वजन जास्त असल्याने पुलाला धोका असल्याचा साक्षात्कार अधिकार्‍यांना झाला आणि बसवलेल्या लाद्या पुन्हा काढण्यात आल्या. एप्रिलमध्ये नवीन लाद्या बसवण्यात आल्या. नवीन पनवेलमध्ये जाण्यासाठी असलेल्या या एकमेव पुलावर बसवण्यात आलेल्या या लाद्या जून महिन्यापासूनच निघण्यास सुरुवात झाली. याशिवाय या पुलावर पन्हाळ लावण्याची सल्लागार समितीच्या बैठकीत सतत दोन वर्षे मागणी करूनही संबंधित अधिकारी दुर्लक्ष  करीत आहेत. नवीन पनवेलकडे जाणार्‍या एकमेव पुलावर सकाळ -संध्याकाळ मोठ्या प्रमाणात गर्दी होते.

तेथे पाणी पडल्याने चिकट होत आहे. त्यातच आता या लाद्या निघल्याने आणि वाकड्या -तिकड्या झाल्याने व तेथून जाताना प्रवाशांचा पाय अडकून अनेक प्रवासी पडत आहेत. त्याकडे दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply