Breaking News

शिरवणेत अनधिकृत फेरीवाल्यांचे बस्तान

बांधकाम साहित्य फुटपाथवर; नागरिक त्रस्त

नवी मुंबई : प्रतिनिधी

शिरवणेगावतील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत फेरीवाल्यांची बस्तान मांडले आहे. दुचाकी व  चारचाकी वाहनांची समस्या तर जैसे थे आहे. त्यातच गावातील मुख्य रस्त्याच्या लगत चालू असणार्‍या घरांच्या बांधकांमाचे साहित्य संबंधित ठेकेदाराने चक्क फुटपाथवर ठेवल्याने अरुंद रस्ता असलेल्या शिरवणे गावात वाहतूक कोंडी होत आहे. त्याचबरोबर नागरिकांना चालणे मुश्कील झाले आहे. शिरवणे गावातील मुख्य मार्गाच्या लगत असणार्‍या तीन इमारतीच्या पुनर्बांधणीचे काम सध्या जोरात सुरू आहे, मात्र बांधकाम करीत असताना बांधकाम साहित्य संबंधित ठेकेदाराने चक्क पदपथावर ठेवले असून पादचार्‍यांना ये-जा करण्यास मुश्किल झाले आहे. गावातील हा मुख्य मार्ग अगोदरच अरुंद असल्याने गर्दीच्या वेळेस मोठ्या वाहनांना मार्गक्रमण करणे जिकिरीचे होत असून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. शिरवणेगाव ठाणे-बेलापूरपट्टीतील महत्त्वाचे गावे असून येथे मोठी बाजारपेठ आहे. रविवारच्या बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी लाबवरून नागरिक येत असतात. या गावातील मध्यभागी मुख्य रस्त्यालगत इमारतीच्या पुनर्बांधणीचे काम जोरात सुरू आहेत, मात्र सदर बांधकाम करताना संबंधित ठेकेदाराने बांधकाम साहित्य चक्क जवळीक फुटपाथवर ठेवले असल्याचे दिसत आहे. शिरवणे गावातून बेलापूरच्या दिशेने जाणार मुख्य मार्गावर दोन्ही बाजूस दुकाने आहेत तसेच रस्त्यावर फेरीवाल्यांचे बस्तान असते. दुचाकी आणि चारचाकी गाड्या येथे पार्क केलेल्या आढळतात. ही मुख्य बाजारपेठ असल्याने सकाळी व संध्याकाळी खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी असते. येथील रस्ता अरुंद असल्याने अशातून मार्ग काढत ये-जा करताना दुचाकी आणि चारचाकी वाहन तसेच नवी मुंबई मनपा परिवहनच्या वाशीहून  बेलापूरच्या दिशेला  जाणार्‍या बस मार्ग क्र 21 च्या वाहनचालकांना  मार्गक्रमण करताना मोठी तारेवरची कसरत करावी लागते. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर बिअर बार आणि लेडीज बार असून येथे येणार्‍या ग्राहकाची वाहने सायंकाळी 7 पासून रात्री 11पर्यंत रस्त्यावर उभी होत असल्याने स्थानिक दुकानदार आणि ग्राहकांमध्ये भांडणे नित्याचीच झाली आहे.

अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाई करणे सुरूच असते .संबंधित ठेकेदाराने बांधकाम साहित्य फुटपाथवर टाकले असेल तर त्वरित कारवाई करण्याचे आदेश देतो.

-सुनील पाटील, नेरूळ विभाग अधिकारी

तुर्भेत पदपथांची अतिक्रमणांपासून मुक्ती एपीएमसी वाहतूक विभागाने कारवाई

नवी मुंबई : आशिया खंडातील सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या तुर्भे आणि एपीएमसी परिसरात वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. या परिसरातील पदपथांवर अनेक गॅरेज चालकांनी अतिक्रमण केले आहे. काही ठिकाणी वाहनांचे बेकायदा पार्किंग केले जात असल्याने पादचार्‍यांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत होती. रहदारीस अडथळा ठरणार्‍या वाहनांवर एपीएमसी वाहतूक विभागाने कारवाई केली आहे. तुर्भे येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर ते कांदा-बटाटा मार्केट गेट क्रमांक 1 पर्यंतच्या पदपथावर नेहमीच दुचाकींची पार्किंग केली जात आहे. तसेच अन्नपूर्णा बिल्डिंग ते कांदा-बटाटा मार्केट गेट क्रमांक 1 पर्यंत फेरीवाल्यांनी पदपथ बळकावला आहे. वाशी-तुर्भे लिंक रोडलगत आय.सी.एल. शाळा ते एपीएमसी सिग्नलपर्यंत चारचाकी दुरुस्तीची गॅरेज चालू केली आहेत. यामुळे तुर्भेहून वाशीकडे जाणार्‍या मार्गावरील एक मार्गिका पूर्णपणे गॅरेजवर दुरुस्ती करण्यासाठी आलेल्या रिक्षा, तसेच दुचाकी यांनी व्यापलेली असते. परिणामी, या परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी पाहायला मिळते. तुर्भे गाव, एपीएमसी जलाराम मार्केट, तुर्भे नाका जनता मार्केट येथेही अशीच परिस्थिती होत आहे. त्यामुळे एपीएमसी वाहतूक पोलिस शाखेच्या निरीक्षक विमल बिडवे यांनी पदपथांवरील बेकायदा पार्किंग, वाहनदुरुस्ती करणार्‍यांविरोधात धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार संबंधित 15 गॅरेज मालकांवर मुंबई पोलिस कायदा कलम 102 प्रमाणे कारवाई करण्यात आली. तसेच याप्रकरणी आता न्यायालयात उपस्थित राहून दंड भरावा लागणार आहे.

एपीएमसी परिसरात अरुंद रस्ते असल्याने येथे काही अनुचित प्रकार घडला तर रुग्णवाहिका, अग्निशमन दल, तसेच अन्य आपत्कालीन वाहने यांना अडथळा होऊ नये याविषयी स्थानिक दुकानदार आणि रहिवासी यांचे प्रबोधन केले जात आहे. तसेच पदपथांवर होणार्‍या अतिक्रमणावरही कारवाई केली जाणार आहे.

-विमल बिडवे, पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, एपीएमसी

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply