पेण : प्रतिनिधी
पेण शहरातील स्वरूप सुदर्शन शेळके या विद्यार्थ्याने अभियांत्रिकी पदविका परीक्षेत 99.70% गुण मिळवून महाराष्ट्र राज्यात पहिला येण्याचा मान पटकाविला आहे. स्वरूपने माणगावच्या लोणेरे येथील इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनियरिंग (बाटू) या कॉलेजमधून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगची पदविका प्राप्त केली आहे.
विशेष म्हणजे कोणत्याही खासगी कोचिंग क्लासला न जाता कॉलेजव्यतिरिक्त दिवसातून तीन ते चार तास अभ्यास करून हे यश मिळविल्याचे स्वरूप शेळके याने सांगितले. या यशात कॉलेजचे प्रिन्सिपल डॉ. मधुकर दाभाडे, डॉ. नितीन लिंगायत, प्रा. दीपिका शेट यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच कॉलेजने मला संशोधनासाठी पीएलसी लॅब उपलब्ध करून दिल्यानेच पीएलसी सिस्टीमवर आधारित स्वतंत्र प्रोग्राम तयार करण्यात मला यश प्राप्त झाले आहे. त्यामुळे मी कॉलेजचा व प्राध्यापकांचा आभारी आहे, असे सांगून भविष्यात पदवी अभ्यासक्रम करतानाच यूपीएससी परीक्षा देऊन देशाच्या प्रशासनात हातभार लावून देशसेवा करण्याचा मानस स्वरूप शेळके याने व्यक्त केला.
स्वरूप शेळके या विद्यार्थ्याने पदविका परीक्षेत 99.70% मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावित कॉलेजच्या नावाची प्रतिष्ठा अधिक प्रकाशमान केली आहे, अशी प्रतिक्रिया बाटू कॉलेजचे प्रिन्सिपल डॉ. मधुकर दाभाडे यांनी दिली.
कॉलेजमधील नऊ विद्यार्थ्यांना काही विषय मागील सुमारे दोन वर्षांपासून सोडविता आले नव्हते. या विद्यार्थ्यांना स्वरूपने अभ्यासक्रम स्वतःच्या पद्धतीने शिकविला व अभ्यास करण्याची टेक्निकही शिकवली. त्यामुळे स्वरूपची अभ्यासाची रिव्हिजन तर झालीच, शिवाय या नऊ विद्यार्थ्यांनाही परीक्षेत यश प्राप्त करता आले, अशी माहिती स्वरूपची आई व नॅशनल कॉम्प्युटरच्या संचालिका स्मिता शेळके यांनी दिली.
स्वरूपने अभियांत्रिकी पदविका परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकाविल्याने ज. का. ठाकूर मित्र परिवार मेढेखार, आगरी समाजाच्या वतीने अध्यक्ष कैलास पिंगळे, धावेश्वर क्रीडा मंडळ , पाटील परिवार, शेळके परिवार, नवतरुण नवरात्र मित्र मंडळ सांबरी यांनी त्याला सन्मानित केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Check Also
पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे
आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …