तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान मेघालयची राजधानी शिलाँग येथे एका जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते, विरोधक ‘मर जा मोदी-मर जा मोदी’ म्हणत आहेत, पण जनता ‘मोदी तेरा कमल खिलेगा’ म्हणत आहे. पंतप्रधानांची ही भविष्यवाणी खरी ठरली आहे. भाजपने त्रिपुरात पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळवित विजय साकारला, तर नागालँडमध्येही यश मिळविले. मेघालयात त्रिशंकू स्थिती निर्माण झाली असून नॅशनल पीपल्स पक्ष (एनपीपी) सर्वांत मोठा ठरला आहे. ईशान्य भारतातील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. तिन्ही राज्यांत प्रत्येकी 60 सदस्यसंख्या असून विजयासाठी किमान 31 जागा जिंकणे आवश्यक असते. त्रिपुरात 16 फेब्रुवारी, तर मेघालय आणि नागालँडमध्ये 27 फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया झाली होती. या राज्यांमध्ये अनुक्रमे 88 टक्के, 76 टक्के आणि 84 टक्के असेे भरघोस मतदान झाले. एकेकाळी ईशान्यकडच्या राज्यांमध्ये भाजप कमकुवत होता, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी ट्रेण्ड बदलला असून देशभर भाजपचा विस्तार होताना दिसत आहे. अपेक्षेप्रमाणे भाजपने मॅजिक फिगरच्या 31हून अधिक जागांसह त्रिपुरात पुन्हा एकदा बाजी मारली. भाजपसाठी हा विजय महत्त्वपूर्ण आहे, कारण या वेळी तेथे काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष एकत्र आले होते, पण भाजप आणि आयपीएफटी आघाडीच्या झंझावातापुढे त्यांचा निभाव लागला नाही. गेल्या वेळी म्हणजेच 2018मध्ये भाजप त्रिपुरात पहिल्यांदा सत्तेवर आला होता. डाव्यांच्या अनेक वर्षांच्या राजवटीला त्या वेळी सुरूंग लागला होता. याआधी तेथे भाजपला तुरळक यश मिळायचे, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटन कौशल्यातून पाच वर्षांपूर्वी भाजपने त्रिपुरात ‘कमळ’ फुलविले. त्यानंतर सलग दुसर्यांदा भाजपचे सरकार स्थापन होणार आहे. त्रिपुरात बंगाली तसेच आदिवासी समाज मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे याचा आगामी काळात आदिवासीबहुल मध्य प्रदेश व अन्य राज्यांत भाजपला फायदा होऊ शकतो. नागालँडमध्येही भाजपने नॅशनॅलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव पक्षाच्या (एनडीपीपी) साथीने सत्ता मिळविली आहे. गेल्याच वर्षी एनडीपीपी आणि भाजप यांनी एकत्र निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. त्यानुसार त्यांनी संयुक्तपणे विरोधकांना धूळ चारली. येथील निवडणुकीचे एक वैशिष्ट्य म्हणजे एनडीपीपीच्या उमेदवार हेकानी जाखलू यांनी विजय मिळवून पहिली महिला आमदार होण्याचा बहुमान मिळविला आहे. मेघालयमध्ये मात्र कोणताही पक्ष स्पष्ट बहुमत मिळवू शकलेला नाही. तेथे नॅशनल पीपल्स पक्षाने (एनपीपी) सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. गेल्या वेळी याच पक्षासोबत भाजप मेघालयमध्ये सत्तेत होता. आता या वेळी एनपीपीचे नेते कोनराड संगमा काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रातील विधानसभा पोटनिवडणुकीत संमिश्र निकाल लागला. चिंचवड मतदारसंघातून भाजपच्या अश्विनी जगताप विजयी झाल्या, तर कसबा पेठमधून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळविला. अनुक्रमे लक्ष्मण जगताप व मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली होती. देशभरात निकाल काहीही लागो केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विकासासाठी भाजप कटिबद्ध आहे.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …