रायगड एलसीबीची कारवाई; आठ दुचाकी जप्त
खोपोली : प्रतिनिधी
पुण्यातून रायगडमध्ये येऊन दुचाकी चोरी करणार्या प्रियकर-प्रेयसीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग (एलसीबी) रायगड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून चोरलेल्या आठ दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.
विक्रम राम कालेकर, (वय 36, रा. यशवंतनगर, खराडी, पुणे; मूळ रा. लाडवली, ता. पनवेल, जि. रायगड) आणि त्याची प्रेयसी अनुराधा विवेक दंडवते (वय 31, रा. यशवंतनगर, खराडी, पुणे; मूळ रा. पर्वती पायथा, स्वारगेट, पुणे) अशी आरोपी प्रियकर-प्रेयसीची नावे आहेत. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून दुचाकी चोरी केली होत्या.
विक्रम हा पुणे रांजणगाव येथील एमआयडीसीमध्ये एका कंपनीत नोकरीला आहे. कंपनीतून सुटीच्या दिवशी तो गर्लफ्रेंड अनुराधाला घेऊन पेण आणि रसायनी पोलीस ठाणे हद्दीतून दुचाकी चोरी करायचा. ज्या परिसरात ते चोरी करायचे आहे त्या परिसरात आधी फिरून रेकी करायचे.
या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गोपनीय बातमीदारमार्फत माहिती घेतली. फुटेजमधील संशयित आरोपी विक्रम आणि अनुराधा असल्याची पक्की खात्री झाल्यावर पथकाने कसून तपास करीत आरोपींना ताब्यात घेतले. त्यांनी पेण हद्दीत तीन, रसायनी हद्दीत पाच आणि खांदेश्वर, नवी मुंबई हद्दीत दोन चोर्या केल्याची कबुली विक्रमने दिली. सुमारे दोन लाख 13 हजार किमतीच्या आठ दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.