Breaking News

महाआघाडीत जुंपली

छगन भुजबळ-सेना आमदारामध्ये खडाजंगी

नाशिक : प्रतिनिधी
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या मोठी शाब्दिक चकमक झाल्याचे समोर आले आहे. आपत्कालीन निधी आणि अतिवृष्टीमुळे
झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याच्या मुद्यावरून पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. या वेळी सुहास कांदे यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजीदेखील केली. नाशिकमधील नांदगावमध्ये हा प्रकार घडला आहे.
पालकमंत्री छगन भुजबळ हे नुकसान पाहणी दौर्‍यावर होते. नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर त्यांची लोकप्रतिनिधी आणि अधिकार्‍यांसोबत बैठक होती. या बैठकीला शिवसेना आमदार सुहास कांदे हे सुद्धा उपस्थित होते. या दोघांमध्ये नुकसानीच्या तातडीच्या मदतीवरून शाब्दिक चकमक सुरु झाली. शब्दाने शब्द वाढत गेला आणि दोघेही मोठमोठ्या आवाजात भांडू लागले.
सुहास कांदे यांनी सांगली-कोल्हापूरच्या महापुरावेळी जशी मदत दिली होती, तशीच तात्काळ मदत मिळावी अशी मागणी केली. त्यावेळी छगन भुजबळ यांनीही त्यांना मदतीचे आश्वासन दिले, मात्र तातडीच्या मदतीवरुन दोघांमध्ये सुरु झालेली बाचाबाची, बाहेर पडेपर्यंत थांबलीच नाही. सुहास कांदे यांच्या समर्थकांनी त्याचवेळी घोषणाबाजीही केली.

Check Also

टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग उत्साहात

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी प्रांत 3131मधील …

Leave a Reply