आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून कौतुक
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिका हद्दीतील तीन नवीन नागरी आरोग्य केंद्र आणि चार आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांचे उद्घाटन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 21) करण्यात आले. या वेळी बोलताना त्यांनी, कोरोनानंतर सगळ्या जगाची आरोग्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली. लोकांचा स्वतःचा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून महापालिका चांगल्या आरोग्यसेवा नागरिकांना पुरविण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे सांगत कौतुक केले.
नागरिकांना प्राथमिक उपचारांच्या उत्तम सुविधा मिळण्याच्या दृष्टीने पनवेल महापालिका क्षेत्रात रोहिंजण, पाले खुर्द, भिंगारी येथे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच खारघर सेक्टर 12, कोयनावेळे, पडघे, टेंभोंडे येथे आरोग्यवर्धिनी उपकेंद्र उभारण्यात आली आहेत. या केंद्रांच्या उद्घाटन समारंभास महापालिका आयुक्त गणेश देशमुख, आरोग्य सेवा मुंबई मंडळ ठाणे सहाय्यक संचालक डॉ. चाकूरकर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, उपायुक्त सचिन पवार, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, माजी नगरसेवक हरेश केणी, नरेश ठाकूर, माजी नगरसेविका आरती नवघरे, नेत्रा पाटील, भाजप नेते किर्ती नवघरे, चाहूशेठ पाटील, जनार्दन पाटील, अमर उपाध्याय, गुरूनाथ गायकर, किरण पाटील, वासुदेव पाटील यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
पनवेल महापालिकेच्या माध्यमातून तीन नवीन नागरी आरोग्य केंद्र, चार आरोग्यवर्धिनी उपकेंद्र वेगवेगेळ्या सेवांसह लोकांच्या सेवेमध्ये दाखल होत आहेत. या ठिकाणी मिळणार्या सुविधा लोकांना अधिकाधिक निरोगी राखण्यासाठी व जलद उपचार मिळण्यासाठी उपयुक्त ठरतील. येथे सकाळी 9पासून संध्याकाळी 5पर्यंत डॉक्टर उपलब्ध असतील. या सगळ्या सेवेबद्दल मी महापालिकेचे अभिनंदन करतो, असे आमदार प्रशांत ठाकूर या वेळी म्हणाले.
आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले की, या वर्षीचे महापालिकेच्या बजेटमधील मोठा भाग आरोग्यसेवेसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. लोकांपर्यंत पोहचण्यासाठी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र वाढविण्याची गरज होती. महापालिका यंदा नऊ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्यवर्धिनी केंद्र उभारणार आहे. यातील तीन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व चार आरोग्यवर्धिनी उपकेंद्राचे लोकार्पण आज करीत आहोत.उर्वरित आरोग्य केंद्राचे कामदेखील लवकरच पूर्ण करणार आहोत.
सहाय्यक उपसंचालक डॉ. चाकूरकर म्हणाले की, गरोदर मातांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंतच्या सर्व नागरिकांना विविध योजनांच्या माध्यमातून शासन आरोग्यसेवा देत असते. ग्रामीण भागातील लोक दिवसभर काम करून संध्याकाळी ते दवाखान्यात येत असतात. हे लक्षात घेऊन महापालिका रात्री 8पर्यंत नागरिकांना आरोग्यसेवा देणार असल्याचा निर्णय अत्यंत स्तुत्य आहे. या आरोग्य सुविधांचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा.
या कार्यक्रमादरम्यान सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गरोदर मातांना मोफत सोनोग्राफी सुविधा देण्याकामी सहा सोनोग्राफी सेंटरसोबत सामंजस्य करार करण्यात आले. याचबरोबर गरोदर मातांमधील रक्तक्षय असलेल्या मातांना मोफत रक्त व रक्तघटक देण्याच्या दृष्टीने दोन रक्तपेढ्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले तसेच संशयित क्षयरुग्णांच्या मोफत डिजिटल एक्स-रे चाचण्या करण्याकामी पाच एक्स-रे सेंटरसेाबत सामंजस्य करार, पालिका हद्दीतील पॅथालॉजी सेंटरच्या ऑनलाईन नोंदणीकरिता नवीन संकेतस्थळाचे प्रक्षेपण, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे मशीनद्वारे निदान करणार्या सेवा पुरवठाधारकाशी सामजंस्य करार मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या स्वाक्षरीने करण्यात आले. त्याचप्रमाणे या वेळी पालिका हद्दीतील पॅथालॉजी सेंटर ऑनलाईन नोंदणीच्या संकेतस्थळाचे प्रात्यक्षिक देण्यात आले.