Breaking News

नागोठणे ते आमडोशीफाटा मार्गाची दुरवस्था

9 डिसेंबरपासून रस्ता बंद करण्याचा मनसेचा इशारा

नागोठणे : प्रतिनिधी

नागोठणे – रोहे मार्गातील नागोठणे ते आमडोशी फाट्यापर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. मात्र संबंधित विभागाकडून त्याची दुरुस्ती होत नसल्याच्या निषेधार्थ बुधवारी (दि. 9) सकाळी दहा वाजल्यापासून सदरचा रस्ता बंद करण्यात येईल, असा इशारा रोहे तालुका मनसेचे पदाधिकारी प्रल्हाद पारंगे, विनायक तेलंगे, साईनाथ धुळे, गोरखनाथ पारंगे, मंगेश रावकर, अमित पवार यांनी अलिबागच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

रोहे – नागोठणे मार्गात आंबेघर फाटा ते आमडोशी फाटा या साधारणतः तीन ते साडेतीन किलोमीटर लांबीच्या मार्गाची सध्या दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी दोन ते तीन फूट खोल आणि दहा ते पंधरा फूट रुंदीचे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे एसटी महामंडळाने या रस्त्यावरून बसेस नेणे बंद केले असून, या गाड्या सध्या नागोठणे, वाकण, आमडोशी मार्गे रोह्याकडे मार्गक्रमण करीत आहेत. पावसाळा संपून काही महिने उलटूनही संबंधित खात्याकडे कोणताही ठोस कृती कार्यक्रम नसल्याने ही परिस्थिती ओढवली असल्याचे मनसेचे तालुका सरचिटणीस प्रल्हाद पारंगे यांचे म्हणणे आहे.

या रस्त्याच्या दुरवस्थेकडे यापूर्वी 8 ऑक्टोबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यात आले होते. त्यावेळी पावसाळा संपल्यानंतर या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम लवकरात लवकर हाती घेण्यात येईल, असे या विभागाच्या उपअभियंत्यांनी 15 ऑक्टोबर रोजी पत्राद्वारे कळविले होते. मात्र, डिसेंबर महिना उजडूनही त्याकडे दुर्लक्षच होत असल्याचे निदर्शनास आल्याने 9 डिसेंबरपासून हा रस्ता मनसेकडून बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचा प्रल्हाद पारंगे यांनी स्पष्ट केले.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply