Breaking News

पनवेलमधील ऑक्सिपार्कचे लोकनेते रामशेठ ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : प्रतिनिधी
पनवेल शहरातील शहीद भोसले पेट्रोल पंपाजवळ कोशिश फाउंडेशनच्या वतीने उभारण्यात आलेल्या ऑक्सिपार्कचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 28) करण्यात आले.
या कार्यक्रमास भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका माजी सभागृह नेते व कोशिश फाउंडेशनचे अध्यक्ष परेश ठाकूर, भाजप शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक अनिल भगत, अजय बहिरा, राजू सोनी, प्रभाकर बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, उद्योजक राजू गुप्ते, संजय जैन, भाजप ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयूरेश नेतकर, भाजप शहर सरचिटणीस अमरिश मोकल, कोशिश फाउंडेशनचे अभिषेक पटवर्धन, चिन्मय समेळ, अ‍ॅड. चेतन जाधव उपस्थित होते.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, कोशिश फाउंडेशनच्या ऑक्सिपार्कमुळे पनवेलच्या सौंदर्यात भर पडली असून संध्याकाळी वेळ घालवण्यासाठी चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. पनवेल शहर किती सुंदर होत आहे. याचे श्रेय मी कोशिश फाउंडेशन म्हणजेच परेश टीमला देतो. यापुढेही पनवेलचा विकास चारही बाजूने होईल.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी, कोशिश फाउंडेशनच्या ऑक्सिपार्क उपक्रमातून प्रेरणा घेऊन अनेक संस्थांनी पुढे येऊन शहरात असे उपक्रम राबविल्यास पनवेल शहराचे स्मार्ट सिटीत रूपांतर होण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन केले.
आमदार प्रशांत ठाकूर पुढे म्हणाले की, पूर्वी आम्ही किती वाईट आणि गरीब आहोत असे दाखवले की जास्त मदत मिळत असे, पण नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर स्मार्ट सिटी बनवण्यासाठी तुम्ही किती खर्च करणार हे सांगा, मग मदत देऊ असे सांगितल्याने आज सगळे काम करताना दिसत आहेत. पनवेल महापालिका झाल्याने विकासाला सुरुवात झाली. धानसर गावापासून स्मार्ट सिटीच्या कामाला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी चौक सुंदर झाला. वडाळे तलाव पनवेलचे भूषण ठरत आहे. त्यामुळे लोकांना महापालिकेची ताकद समजली आहे.
आयुक्त गणेश देशमुख यांनी ऑक्सिपार्क तयार करण्याचा उपक्रम महापालिका हद्दीत एनजीओने सुरू केला याचा अभिमान वाटत असल्याचे सांगून यामुळेच महापलिकेला शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा 2023मध्ये महाराष्ट्र राज्यात ‘ड’ वर्ग महापालिका गटात प्रथम क्रमांक मिळण्यासाठी फायदा झाल्याचे सांगितले. असे उपक्रम समाजात प्रोत्साहन देतात. कोशिश फाउंडेशन व राजू गुप्ते यांनी अजून काही जागा निवडून तेथे ऑक्सिपार्क तयार केल्यास 25 टक्के तुमचे व महापालिका 75 टक्के निधी देईल, असे सांगितले. त्याला होकार देऊन अजून दोन ठिकाणी ऑक्सिपार्क तयार करण्याची तयारी परेश ठाकूर व राजू गुप्ते यांनी दाखवली.
प्रास्ताविकात परेश ठाकूर यांनी, शहरातून जाणारा महामार्ग शाप ठरू नये, ध्वनी प्रदूषण, धूळ व उष्णतेपासून संरक्षण व्हावे म्हणून आम्ही हा पार्क तयार करण्याची संकल्पना मांडली आणि महापालिकेने त्याला परवानगी दिल्यावर अमिर गोकर्णा यांनी प्लान करून दिला. एका वर्षात हा पार्क तयार केल्याचे सांगितले. या वेळी हा पार्क तयार करणार्‍या योगेश महाजन यांचा सन्मान करण्यात आला.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply