पनवेल ः बातमीदार : जगभरासह महाराष्ट्रतदेखील कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. या विषाणूंचा संसर्ग वाढू नये म्हणून माची प्रबळ गड येथे पर्यटनस्थळांवर प्रवेशबंदी करण्यात आली आहे. 31 मार्चपर्यंत येथे जाण्यास संयुक्त वन व्यवस्थापन समितीने बंदी घातली आहे.
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कॅम्पिंगसाठी प्रबळ माची उत्तम जागा आहे. बाराही महिने येथे पर्यटक गर्दी करतात. मुंबई-पुण्यातील बहुतेक ट्रेकर्सचे आवडते ठिकाण म्हणजे प्रबळगड- कलावंतीण दुर्ग. दोन्ही दुर्ग पनवेल माथेरानच्या मध्यभागी वसलेले आहेत. त्यामुळे पर्यटक येथे आकर्षित होतात. थंडी आणि उन्हाळ्यातदेखील पर्यटक माची प्रबळगडावर मोठ्या संख्येने येतात, मात्र सद्यस्थितीत कोरोनाच्या संसर्गामुळे संयुक्त वन व्यवस्थापन समितीने सुरक्षेच्या कारणास्तव 31 मार्चपर्यंत येथे पर्यटकांना न येण्याचे आवाहन केले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्याने रायगडच्या जिल्हाधिकार्यांनी पर्यटन स्थळांवर बंदी घातली आहे. त्यामुळे माची प्रबळगडावर पर्यटकांनी 31 मार्चपर्यंत येऊ नये, असे संयुक्त वन व्यवस्थापन समितीने कळविले आहे.