मुरूड : प्रतिनिधी
मुरूड-मुंबईला जोडणार्या महत्त्वाच्या अशा विहूर पुलाकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे जिकिरीचे असते. विहूर पुलावरून मुंबईकडे जाणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे, परंतु अतिवृष्टीमुळे या पुलाकडील संरक्षक भिंतीमधील माती वाहून गेल्याने मोठा खड्डा तयार झाला आहे. जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे ही माती ज्या वेळी वाहून गेली होती. त्या वेळी तातडीने या पुलाची डागडुगी करून भराव भरून हा पूल पूर्वस्थितीत आणला गेला होता, परंतु 8 सप्टेंबर रोजी 547 मिमी पाऊस झाल्याने पुन्हा त्याच जागेतील माती वाहून गेल्याने पूर्वीपेक्षा मोठा खड्डा तयार झाला आहे. सध्या या पुलावरून एकेरी वाहतूक सुरू आहे.
याबाबत अनेक वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर मुरूड येथील सार्वजनिक बांधकाम खात्याला जाग आली असून त्यांनी हा खड्डा भरण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. विहूर पुलानजीक पडलेला खड्डा बुजवताना सार्वजनिक बांधकाम खात्याला काँक्रिटच्या संरक्षक भिंत बांधण्याचा मात्र विसर पडला आहे. कारण जर पुन्हा जोरदार पाऊस आल्यास ही माती निघून जाऊन पुन्हा याच ठिकाणी खड्डा तयार होणार आहे. यासाठी विहूर पुलास काँक्रिटची संरक्षक भिंत खूप आवश्यक होती, परंतु सध्या फक्त खड्डा भरून तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील पावसाळ्यात याच संकटाचा सामना करावा लागणार आहे. सध्या पुलाचा खड्डा भरण्याच्या कामाने वेग घेतल्याचे दिसून येत आहे.