कर्जत बटाटावडा, पावसाळी पर्यटनासाठी धबधब्यांचे गाव आणि आता कर्जत शिक्षण पंढरीकडे वाटचाल करतेय त्याच बरोबर कर्जत मिरची बाजारासाठीही प्रसिद्ध आहे. रायगडच नव्हे तर ठाणे, पुणे, मुंबईहून सुद्धा या बाजारात वर्षानुवर्षे ग्राहक येतात आणि आपल्या आवडीची मिरची व खडे मसाले खरेदी करतात. विशेष म्हणजे परदेशात असलेल्या आपल्या नातेवाईकांना सुद्धा कर्जतची मिरची घेऊन तयार मसाला पाठवणारांची संख्याही लक्षणीय आहे. या मिरची बाजाराला शंभर वर्षे होत आली आहेत. यंदा मात्र ग्राहकांना मिरचीचा जोरदार ठसका बसला आहे. त्यामुळे गृहिणींनी मिरची खरेदी करताना हात आखडता घेतला आहे.
सुमारे नव्वद -पंच्याण्णव वर्षांपासून कर्जतचा मिरची बाजार भरतोय. महावीर पेठेत 10-12 दुकानांमध्ये मिरची व खडे मसाले विक्रीसाठी असतात. ही मिरची हैदराबाद – वारंगल, आंध्रप्रदेश-गंटूर, तेलंगणा आदी राज्यातून पुण्यात येते आणि तेथून ती कर्जतच्या बाजारात उपलब्ध होते. हल्ली तयार मसाले मिळत असले तरी पहिल्यापासून ज्यांना कर्जतच्या मसाल्याची सवय आहे ते वर्षभरासाठी मसाला करण्यासाठी कर्जतची बाजारपेठ गाठतात. तसेच ग्रामीण भागात लग्न सोहळ्यासाठी भोजनाचा आस्वाद चांगला चाखायला मिळावा म्हणून वीस ते पंचवीस किलो मसाला करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. खरा हा बाजार चार ते पाच महिनेच असतो आणि सुमारे दोन कोटी रुपयांची उलाढाल होत असते.
जानेवारी ते मे या कालावधीत ही मिरची विकत घेण्यासाठी अगदी पेण, अलिबाग, पनवेल, बदलापूर, कल्याण, डोंबिवली, मुरबाड, शहापूर, लोणावळा, पुणे येथूनच नव्हे तर मुंबईतूनही ग्राहक येत असतात. परदेशातही आपल्या नातेवाईकांना कर्जतमधून मिरची घेऊन मसाला तयार करून पाठवण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. यंदा किंमतीच्या बाबतीत मिरची खूपच ’तिखट’ झाली आहे परंतु तरीही मिरची व खडे मसाले घेण्यासाठी बहुतांश दुकानात ग्राहकांची गर्दी असते. मिरची सहा – सात प्रकारची असते. जयंतीलाल परमार, मदन परमार, शिवलाल गुप्ता हे तीन – चार पिढ्यांपासून हा मिरचीचा व्यापार करतात. काही छोटे व्यावसायिक हातगाडीवरही हा व्यवसाय करतात. हा व्यवसाय हंगामात दोन कोटी रुपयां पर्यंत जातो.
कर्जतमध्ये मसाला दळण्याच्या मोजक्याच गिरण्या आहेत. तर तीन – चार ठिकाणी दणकी पद्धतीने मसाला कुटून दिला जातो. या पद्धतीच्या मसाल्याला चांगली चव असते. दहिवली, आमराई येथे या प्रकारच्या दणक्या आहेत. कर्जत व भिसेगाव येथे दगडेंची मसाला गिरणी प्रसिद्ध आहे. तर गुप्ता बंधूंची गिरणी सुद्धा बर्याच वर्षांपासून सुरू आहे. वांजळे व सावरगाव याच्या मधोमध ठाकरे यांची मसाला गिरणी आहे. त्या भागातील ग्रामस्थ तेथे मिरची, धणे, हळद करुन घेतात. काही मोक्याच्या गावात उदारणार्थ नेरळ, कडाव, कशेळे, कळंब आदी ठिकाणी सुद्धा मसाला गिरणी आहेत तर छोट्या गावांमध्ये सुद्धा मिरची दळून दिली जाते.
यंदा दीड – पावणे दोन पट मिरचीचे दर वाढल्याने अनेक गृहिणींनी मिरची विकत घेताना काटकसर केली आहे. खड्या मसाल्याचे दर स्थिर असल्याने थीदा दिलासा मिळाला आहे. दररोज जेवणात मसाला वापरावा लागत असल्याने नाईलाजाने मिरची खरेदी करण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. या मिरचीच्या दरामुळे गृहिणींचे आर्थिक गणित कोलमडले आहे. तर यंदा दरवर्षी पेक्षा पन्नास टक्केच व्यवसाय झाला आहे. असे व्यापारी वर्गाचे म्हणणे आहे.
मिरची प्रति किलो दर
गतवर्षी यंदा
गंटूर मिरची – 220 रुपये 280 रुपये
लवंगी मिरची – 220 रुपये 280 रुपये
बेडगी मिरची – 280 – 400 रुपये 700 रुपये
काश्मिरी मिरची – 480 – 500 रुपये 800 रुपये
संकेश्वरी मिरची – 240 – 260 रुपये 440 रुपये
पट्टी मिरची – 240 – 260 रुपये 400 रुपये
खडे मसाले प्रति किलो दर
धणे – 180 – 200 रुपये
हळद – 120 – 180 रुपये
बडीशेप – 280 रुपये
दालचिनी – 400 रुपये
लवंग – 800 रुपये
काळीमिरी – 800 रुपये
जावंत्री – 2800 रुपये
नाकेश्वर – 2400 रुपये
– विजय मांडे, कर्जत