केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शिवसेनेचे नेते रामदास कदम, संजय शिरसाठ, भाजपचे आमदार नितेश राणे, भाजपचे नेते प्रवीण दरेकर, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बारसूचे मैदान आरोप प्रत्यारोपांनी गाजवले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हा प्रकल्प त्यांनीच आणला आणि बारसू हे ठिकाणदेखील त्यांनीच सुचवले. असे असताना या प्रकल्पाला विरोध का, असा सवाल उपस्थित करीत त्यांच्या दुटप्पी भूमिकेवरून त्यांच्यावर सर्वच विरोधकांनी जोरदार हल्ला चढविला.
बारसूच्या मैदानात यायला उद्धव ठाकरेंना लाज वाटली पाहिजे. तुम्ही मुख्यमंत्री असताना हा प्रोजेक्ट तुम्हीच आणलात आणि बारसू हेदेखील तुम्हीच सुचवले आणि आता कुठलं काळ तोंड करून कातळशिल्प वाचवायला जात आहात. तुम्हाला थोडी शरम असती तर तिकडे गेला नसता, असा टोला उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी लगावला. हा माणूस किती विश्वासघातकी आहे हे फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच सांगू शकतील. त्यांचे मुख्यमंत्रीपद कसे घालवता येईल याच सुडाच्या भावनेने हा माणूस पेटला आहे, अशी जहरी टीकाही त्यांनी केली आहे. याशिवाय संजय शिरसाठ, आमदार नितेश राणे यांनीही उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांवर हल्ला केला. बारसूमध्ये जर आता लाठीचार्ज किंवा गोळीबार झाला आणि त्यात कोणी शहीद झाले, तर उद्धव ठाकरे यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा ताबडतोब दाखल करा. या प्रकरणी आग लावायचे काम हेच करीत आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी ठाकरेंवर केला आहे. कोकणातील माणसांवर अन्याय आम्ही होऊच देणार नाही, कारण उद्धव ठाकरे यांनी कोकणातील नेत्यांना संपवण्याची सुपारी घेतली आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनीही उद्धव ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला, तर मी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना अभिनंदन करण्यासाठी मंत्रालयात गेलो तेव्हा तिथल्या स्टाफने सांगितले. साहेब यापूर्वीचे मुख्यमंत्री अडीच वर्षांत दोन वेळाच आले. जेमतेम तासभर बसायचे आणि जायचे आणि पेटवायला कुठे कधी फिरणार, कसे फिरणार? हॅलिकॉप्टरमधून मशाल घेऊन पेटवत जाणार की काय, अशा शब्दांत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली. बारसुमध्ये जर आता लाठीचार्ज किंवा गोळीबार झाला आणि त्यात कोणी शहीद झाले तर उद्धव ठाकरे यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा ताबडतोब दाखल करा. या प्रकरणी आग लावायचे काम हेच करीत आहेत असा गंभीर आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे. उद्वव ठाकरेंच्या बारसू दौर्यावर शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनीही टीका केली. उद्धव ठाकरे बारसूत विकासामध्ये अडथळा तयार करण्यासाठी जात आहेत. आधी स्वतः प्रकल्पासाठी पत्र देऊन ते आता विरोध करीत आहेत, असा केसरकरांनी ठाकरेंवर निशाणा साधला. सरतेशेवटी रत्नागिरी येथे झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांचे बंधू तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांंनी त्यांच्यावर टीका केली. पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष येऊन गेले. आता सांगतात जी लोकांची भावना ती आमची भावना आहे. बाळासाहेबांच्या नावाने मुंबईचा महापौर बंगला जो ढापला तो लोकांना विचारून ढापला का? असा टोला राज यांनी लगावला. लोक निवडून देतात तेव्हा लोकांचे हित पाहिलेच पाहिजे. लोकांची काळजी घ्यायची असते, मात्र हे लोकं लोकांना फसवत आले, मूर्ख बनवत आले. ही माणसं कधी प्रदेशाची धूळधाण करतील हे समजणार नाही, असेही ते म्हणाले.