Breaking News

स्नेहल जगताप यांच्या ठाकरे गट प्रवेशामुळे काँग्रेस नाराज

मुंबई ः प्रतिनिधी
महाडच्या माजी नगराध्यक्ष आणि काँग्रेस नेत्या स्नेहल जगताप यांच्या ठाकरे गटातील प्रवेशाने महाविकास आघाडीत असंतोष उफाळला आहे. जगतापांच्या प्रवेशावरून काँग्रेस पक्ष हा ठाकरे गटावर नाराज झाला असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत माजी मुख्यमंत्री व ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंबद्दल नाराजी बोलून दाखविली आहे.
काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस स्नेहल जगताप यांनी दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. महाडमध्ये शनिवारी शिवगर्जना सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उद्धव ठाकरेंसह ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांच्या उपस्थितीत जगताप यांनी पक्षप्रवेश केला. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, आम्ही उद्धव ठाकरे यांना सांगितले होते, असे करू नका, पण तरी त्यांनी केले. स्नेहल जगताप यांना पक्षात प्रवेश दिला. अशा प्रकारे महाविकास आघाडीतील एका पक्षाला कमजोर करण्याचे काम होत असेल, तर ते चुकीचे आहे. महाविकास आघाडीची जेव्हा चर्चा होईल तेव्हा हा मुद्दा उपस्थित केला जाईल. महाडची जागा काँग्रेसची आहे आणि आम्ही ती जागा लढणार आहोत.
स्नेहल जगताप या गेल्या अनेक महिन्यांपासून ठाकरे गटात जाण्यास इच्छूक होत्या. सहा महिन्यांपूर्वी जगताप यांनी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर काँग्रेसने जगताप यांना पक्षात प्रवेश देऊ नये, अशी विनंती उद्धव ठाकरे यांना केली. त्यामुळे हा प्रवेश रखडला होता, मात्र दोन दिवसांपूर्वी अखेर जगताप यांचा पक्षप्रवेश झाला. परिणामी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply