Breaking News

पोलादपूर तालुक्याची तहान भागणार

29 बोअरवेलची मंजूरी; कुडपण खुर्दचीही मागणी

पोलादपूर : प्रतिनिधी : तालुक्याच्या पाणी पुरवठा कृती आराखड्यात मागणी केल्या पैकी 29 बोअरवेलना मंजूरी प्राप्त झाली आहे. संबंधीत ग्रामपंचायतीकडे  बोअरवेलसाठी निधी वर्ग करण्यात आला असून, पंचायत समितीचे शाखा अभियंता या कामी सर्व सोपस्कार पूर्ण करणार असल्याने बोअरवेल कागदोपत्री करण्याचे प्रकार थांबण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, त्याचबरोबर दूर्गम भागातील कुडपण खुर्द या गावाची तहान भागविण्यासाठी बोअरवेलची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.

गेल्या पाच वर्षांपूर्वी पोलादपूर तालुक्यात तालुका कृषी कार्यालयामार्फत बांधण्यात आलेले 50 हून अधिक सिमेंट बंधारे पाणी अडविण्यास कुचकामी ठरले.  डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवशी श्रीसदस्य मंडळींनी बोअरवेलचे पुनर्भरण करण्यासाठी व्यापक प्रयत्न केले आहेत. मात्र, ते नगण्य ठरत आहेत. पोलादपूर तालुक्यातील देवळे आणि कालवली येथील धरणे पाऊस थांबताच रिकामी होत आहेत. फक्त सावित्री नदीकिनार्‍यालगतच्या पोलादपूर ते पार्लेपर्यंतच्या गावांतील विंधनविहिरीच यशस्वी होत आहेत.

पोलादपूर तालुक्यातील कुडपण खुर्द या गावात सद्यस्थितीत प्रचंड पाणीटंचाई जाणवत असून पाण्याच्या दूर्भिक्ष्यामुळे येथील ग्रामस्थ स्थलांतरीत झाल्याचेही पाहण्यास मिळत आहे. बोअरवेलची गरज असूनही केवळ या गावाचे लोकप्रतिनिधीत्व करणारेही पोलादपूर शहरामध्येच वास्तव्यास असल्याने कोणीही पाठपुरावा करण्याची इच्छाशक्ती बाळगून नाही.

पोलादपूर तालुक्याच्या पाणी पुरवठा कृती आराखडयात  भूपृष्ठाखालील पाण्याचा उपसा करणार्‍या बोअरवेलना गेल्या अनेक वर्षांपासून प्राधान्य देण्यात आले आहे. सर्व प्रयत्न हारल्यानंतर आता केवळ बोअरवेलच पोलादपूरवासियांची तहान भागवू शकतील, असा विश्वास निर्माण झाला आहे.

पोलादपूर तालुक्यात 29 बोअरवेल मंजूर

पोलादपूर तालुक्यातील बोरावळे, आडावळे, मोरगिरी गावठाण, बोरघर, कामथे, धामणदिवी, आडावळेखुर्द आदी सात गावे आणि गोवेले महादेवाचा मुरा, वाकण पितळवाडी, वाकण कुंभारवाडी, रानबाजिरे सोनारवाडी, धारवली पाटीलवाडी, कोतवाल धनगरवाडी, चांभारगणी कोंडीचीवाडी, गोवेले आदिवासीवाडी, लोहारे उंबरकोंड, वाकण धामणीची वाडी, धारवली आंग्रेकोंड, चरई रेडेखाचर, रानबाजिरे गोपाळवाडी, महाळुंगे पवारवाडी, बोरावळे मोरेवाडी, मोरगिरी फौजदारवाडी, आडावळे खडकवाडी, दिवे कुंभारकोंड, दिवे कुंभारवाडी, कापडे बुद्रुक माळवाडी या 22 वाडयांमध्ये प्रत्येकी एक अशा 29 बोअरवेलची मंजूरी जिल्हा पाणीटंचाई निवारण समितीकडून प्राप्त झाली आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply