Breaking News

इको व विक्रम मिनीडोअर वाहनचालक-मालकांच्या मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक

आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने नागपुरात झाली बैठक

पनवेल, नागपूर : रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यातील इको व विक्रम मिनीडोअर वाहनचालक व मालकांच्या विविध मागण्यांसंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने राज्याच्या परिवहन विभागाचे पराग जैन यांच्यासोबत नागपूरमध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाली. एमएमआरटीए क्षेत्रात परमिट ट्रान्सफर फी कमी करावी, व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस, कोरोना काळातील सानुग्रह लागू करावे अशा विषयावर झालेल्या या बैठकीत सचिव पराग जैन यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, रायगड जिल्हा इको, विक्रम मिनीडोअर चालक मालक संघटना व वंदे मातरम् जनरल कामगार संघटना यांना दिले. या बैठकीमुळे राज्यातील इको व विक्रम मिनीडोअर चालक मालक यांना मोठा फायदा होणार आहे.
या बैठकीस परिवहन उपायुक्त जितेंद्र पाटील, पनवेल प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील, रायगड जिल्हा विक्रम-मिनीडोर संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील, भाजपप्रणित वंदे मातरम संघटनेचे अध्यक्ष रवी नाईक, निलेश वांगीलकर, हेमंत म्हात्रे, जगदीश पाटील, विश्वनाथ गडगे, दीपक नावडेकर, श्याम भगत, शंकर पाटील, धीरज कोळी, जयवंत शिर्के, विकास पारंगे, रमेश केणी, अंबादास पाटील, दिपक ठोंबरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यातील इको, विक्रम मिनीडोअर चालक मालक संघटना व वंदे मातरम् जनरल कामगार संघटना यांच्या विविध मागण्यांसंदर्भात 17 मार्च 2023 रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बैठक झाली होती. त्या अनुषंगाने शासनाकडे प्रस्ताव तयार करण्यात आले होते. या सर्व विषयांची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी यासाठी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार नागपूर येथे राज्याचे परिवहन विभाग सचिव पराग जैन यांच्यासमवेत बैठक पार झाली.
महाराष्ट्र शासनाकडून कोविड 19च्या पार्श्वभूमीवर तीनचाकी, तीन आसनी रिक्षाचालकांना 1500 रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले त्याप्रमाणे ते चारचाकी, सहा आसनी टॅक्सी चालकांना मिळावे, एमएमआरटीए क्षेत्रात परमिट ट्रान्सफर फी 25 हजार रुपये एवढी आकारण्यात येत आहे ती 10 हजार करण्याची सकारात्मक चर्चा झाली होती, परंतु त्यांचीदेखील अंमलबजावणी झालेली नाही. तीन चाकी सहा आसनी जुन्या परमिटवर चारचाकी सहा आसनी बदली वाहनांच्या व्यवसाय करावर आकारण्यात आलेले चक्रवाढ व्याज माफ करून मूळ कराच्या रकमेच्या भरणा करून वाहने पासिंग व्हावे तसेच व्हीएलटीडी अर्थात व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइससंदर्भात राज्यातील सर्व आरटीओ क्षेत्रात हे डिव्हाईस कार्य करण्यासाठी लागणारी प्रणाली कार्यान्वित झालेली नाही. रायगड जिल्ह्यातदेखील अशीच स्थिती आहे. त्यामुळे वाहनांमध्ये बसविण्यात आलेल्या डिव्हाईसचे आप्तकालिन बटन दाबल्याचा काहीही उपयोग होत नाही आणि ही बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी जोपर्यंत त्या त्या कार्यक्षेत्रात व्हीएलआयडी काम करण्यासाठी असणारी प्रणाली पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होत नाही तोपर्यंत व्हीएलटीडीच्या रिचार्जची सक्ती न करता केवळ वाहनात बसविले व्हीएलटीडी डिव्हाईस पाहून वाहन पासिंग करण्यात यावे, अशी सूचना केली होती, मात्र असे असताना एनआयसी सिस्टममध्ये बदल न केल्याने वाहन पासिंग करण्याकरिता आवश्यक असणारे फिटनेस सर्टिफीकेट निघत नाही. त्यामुळे ही वाहने पासिंग न होता गाडी बंद ठेवावी लागते तसेच इतर सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनदेखील असे वाहन पकडल्यानंतर विनाकारण दंड भरावा लागतो. त्यामुळे वाहनचालक व मालकांना नाहक भूर्दंड सोसावा लागत असल्याची बाब या बैठकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुन्हा अधोरेखित केली. त्याचप्रमाणे पनवेल महापालिका हद्दीत प्रवाशांच्या सोयीसाठी तीन आसनी रिक्षा व सहा आसनी टॅक्सीकरिता अधिकृत थांब्याच्या परवानगीचे अधिकार मुंबई महानगर प्रदेश परिवहन कार्यालयाला न देता पूर्वीप्रमाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाला देण्यात यावेत, अशी मागणीही या वेळी त्यांनी केली.
या बैठकीत सचिव पराग जैन यांनी संबंधित अधिकार्‍यांना सूचना केल्या तसेच या सर्व विषयांवर योग्य कार्यवाही करणार असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, रायगड जिल्हा इको, विक्रम मिनीडोअर चालक मालक संघटना व वंदे मातरम् जनरल कामगार संघटनेला आश्वासित केले. या बैठकीमुळे इको व विक्रम मिनीडोअर वाहनचालक-मालकांना मोठा दिलासा मिळाला असून याचा फायदा राज्याला होणार आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply