Breaking News

विरोधकांच्या खोट्या प्रचाराला उत्तर द्या -मंत्री रवींद्र चव्हाण

अलिबाग, रेवदंडा ः प्रतिनिधी
विरोधकांकडे प्रचारासाठी मुद्दे उरले नसल्याने फेक नरेटीव्ह पसरवले जात आहे. विरोधक मतदारांमध्ये खोटं बोलून गैरसमज पसरवत आहेत. विरोधकांच्या या खोट्या प्रचाराला खर्‍या प्रचाराने उत्तर द्या. पुढचे साडेतीन महिने महत्त्वाचे आहेत. त्यासाठी कोणाच्या आदेशांची वाट पाहू नका. केंद्र व राज्य सरकार राबवत असलेल्या लोकहिताच्या योजना जनतेपर्यंत पोहचवा, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकामंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला आहे.
अलिबाग तालुक्यातील सहाण येथे शुक्रवारी (दि. 2) भाजप दक्षिण रायगड जिल्हा कार्यकर्ता संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी आपल्याला विधानसभा निवडणूक जिंकायची आहे. राज्यात महायुतीचे सरकार आणण्यासाठी मेहनत घ्या. जनतेला प्रत्यक्ष भेटून सरकारच्या योजना व आपले विचार लोकांपर्यंत पोहचवा, असे त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना सूचित केले.
या कार्यकर्ता संमेलनास आमदार संजय केळकर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविशेठ पाटील, भाजप प्रदेश महासचिव विक्रांत पाटील, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष माजी आमदार धैर्यशील पाटील, संघटक सतीश धारप, उपाध्यक्ष दिलीप भोईर, वैकुंठ पाटील, राजेश मपारा, अ‍ॅड. पल्लवी तुळपुळे, सरचिटणीस अ‍ॅड. महेश मोहिते, मिलिंद पाटील, सहकार आघाडी कोकण सहसंयोजक गिरीश तुळपुळे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष हेमा मानकर, अ‍ॅड. नीलिमा पाटील, भाजप अलिबाग तालुकाध्यक्ष उदय काठे, हेमंत दांडेकर, सतीश लेले, बिपीन म्हामूणकर आदी उपस्थित होते.
आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या साडेतीन महिन्यांवर आली आहे. या निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळवून द्यायचे असेल तर आतापासून मेहनत घ्या. जनतेमध्ये आपल्या विचारांची पेरणी करा. योजनांची चर्चा 15 ऑगस्ट रोजी होणार्‍या ग्रामसभांमध्ये घडवून आणा. बोलते व्हा. जबाबदारी समजून काम करा. केंद्र व राज्य सरकार योजना राबवताना कोणताही जातीभेद करत नाही हे लोकांना प्रत्यक्ष भेटून पटवून द्या, असे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे साडेपाच हजार कोटी रुपये खर्चून रस्ते बांधले जात आहेत. यापूर्वी इतका निधी रायगडात कुठल्याच सरकारने दिला नव्हता हे जनतेपर्यंत पोहचवा, असेही मंत्री चव्हाण म्हणाले.
पूर्वी रायगड जिल्ह्यात भाजपाची ताकद नव्हती. आता भाजपची ताकद वाढली आहे. आपल्याला पुढील निवडणुका जिंकायच्या आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी एक विचार घेऊन काम करा. लोकांमधील संभ्रम दूर करा. नवीन मतदारांशी संपर्क साधा, असे आवाहन आमदार संजय केळकर यांनी कार्यकर्त्यांना केले.
केंद्र सरकार देशात मुलभूत सुविधा निर्माण करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देश जोडण्याचे काम करत आहेत. त्यामुळे देशात चैतन्य निर्माण झाले आहे. देशातील जनतेमध्ये विश्वास वाढतोय. देश सामर्थ्यवान बनत आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील जनहिताच्या योजना राबविण्यात येत आहेत. या योजना लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम भाजपच्या कार्यकर्त्यांनी केले पाहिजे, असे आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले.
सर्वत्र विकास होत आहे. देशातील 21 शहरांमध्ये मेट्रो सुरू करण्यात आली आहे. देशात मोजकीच विमानतळ होती. आता देशात 150 विमानतळ आहेत. पनवेल येथे स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात येणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्यात येत आहे. त्यामुळे जगभरातील लोक रायगडात येतील. रायगडचा विकास होईल हे लोकांना समजावून सांगा, असे आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले.
येत्या काही दिवसांत विधानसभेची निवडणूक लागेल. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. या सर्व निवडणुका ताकदीने लढवायच्या आहेत. त्यासाठी कामाला लागा, असे आमदार रविशेठ पाटील यांनी म्हटले.
येत्या विधानसभा निवडणुकीत विजय आपलाच आहे. त्यासाठी कामाला लागा. लोकांमध्ये जो गैरसमज पसरवला जात आहे तो दूर करा, असे प्रदेश महासचिव विक्रांत पाटील म्हणाले. अ‍ॅड. महेश मोहिते, वैकुंठ पाटील, अ‍ॅड. नीलिमा पाटील, हेमा मानकर यांनीदेखील आपले विचार व्यक्त केले. भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी प्रास्ताविक केले. मिलिंद पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रशांत शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
नरेंद्र मोदी तिसर्‍यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव आमदार प्रशांत ठाकूर यांंनी मांडला. त्यास आमदार आमदार रविशेठ पाटील यांनी अनुमोदन दिले. महाराष्ट्र सरकारने मागील दोन वर्षात लोकाभिमुख कारभार केल्याबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन करणारा ठराव अ‍ॅड. महेश मोहिते यांनी मांडला. त्यास वैकुंठ पाटील यांनी अनुमोदन दिले. केंद्र व राज्य सरकारांनी महिलांसाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव अ‍ॅड. नीलिमा पाटील यांनी मांडला. त्यास हेमा पाटील यांनी अनुमोदन दिले. हे ठराव या संमेलनात मंजूर करण्यात आले.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply