पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगडच्या बॅडमिंटन संघटनेकडून खेळणार्या मुलींच्या संघाने अहमदनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. या संघातील खेळाडूंचा रायगड बॅडमिंटन ऑर्गनायझेशन (बीओआर)चे अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 31) सत्कार करण्यात आला.
रायगडचे मुले व मुली अशा दोन्ही संघांनी अहमदनगर येथे झालेल्या योनेक्स-सनराईज स्व. श्रीमती संजिवनी कुलकर्णी स्मृती महाराष्ट्र अंतर्गत अनुक्रमे 15 आणि 17 वर्षांखालील राज्य आंतरजिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग घेतला व चमकदार कामगिरी केली. मुलींनी अंतिम फेरीत पुण्याचा पराभव करून यशाचा सिलसिला कायम ठेवला आणि 2012मध्ये ‘बीओआर’च्या स्थापनेनंतरचे पहिले विजेतेपद नोंदवले.
या पार्श्वभूमीवर बुधवारी रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये विजेत्या मुलींच्या संघाचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे 20 ते 25 ऑगस्ट या कालावधीत चीनमधील चेंगडू येथे होणार्या बॅडमिंटन आशिया अंडर 15 ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात निवड झाल्याबद्दल गाथा सुर्यवंशी हिला 10 हजार रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास उपाध्यक्ष शिवा काराइल, सचिव डॉ. डेव्हिड अल्वारिस, उपसचिव प्रशांत मुखर्जी, खजिनदार नरेंद्र जोशी, सदस्य प्रमोद काराइल, भार्गव ठाकूर, प्रशिक्षक योगेश पाटील, मयुरेश पाटील यांच्यासह कार्यकारी सदस्य, क्रीडा प्रभारी आदी उपस्थित होते.
या वेळी परेश ठाकूर यांनी आपले खेळाडू हे चांगली मेहतन घेत आहेत. त्यामुळे बॅडमिंटन ऑर्गनायझेशन रायगड आणि रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची शान वाढत असल्याचे गौरवोद्गार काढले.
Check Also
‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम
दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …
RamPrahar – The Panvel Daily Paper