नवी मुंबई ः बातमीदार
नवी मुंबई शहरात कोरोना रुग्णांचा आकडा 11 हजार पार गेला आहे. अशा वेळी नवी मुंबई मनपा रुग्णालयासह नवी मुंबईतील खासगी रुग्णालयांत एकही व्हेंटिलेटर शिल्लक नाही ही नवी मुंबईकरांसाठी धक्कादायक बाब असल्याची प्रतिक्रिया आमदार गणेश नाईक यांनी व्यक्त केली. कोविड संसर्गजन्य आजाराबाबत आमदार गणेश नाईक यांनी आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शहरात वाढत चाललेला कोरोनाचा प्रादुर्भाव, सोबतच शहरातील विविध वैद्यकीय समस्यांसंदर्भात त्यांनी या वेळी चर्चा केली. तसेच पालिकेने आयसीयूत असणार्या रुग्णांसाठी रॅमिडिव्हर व टोसिलिझम एब ही औषधे पुरवावीत. औषधांअभावी मृत्यू होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना होईल याची दक्षता पालिकेने घ्यावी. नॉन कोविड रुग्णाला इतर रुग्णालयात घेतले जात नाही. त्याच्याकडून कोविड अहवाल मागितला जातो. रिपोर्ट उशिरा येत असल्याने सामान्य आजारांच्या नागरिकांना त्रासास सामोरे जावे लागते. त्यासाठी पालिकेने प्रमाणपत्र द्यावे म्हणजे रुग्णाला त्वरित उपचार मिळतील. कोविड केअर सेंटरमध्ये पुरुष व महिला विभाग यापुढे वेगवेगळे केले जावेत, अशी सूचना केल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले. आशा वर्करला 10 हजार रुपये देण्याची मागणी मान्य करण्यात आली असून जुन्या कर्मचार्यांना नव्या भरती प्रक्रियेतील वेतनाप्रमाणे वाढीव वेतन करण्यात यावे, ही मागणी मान्य करण्यात आल्याचेही आमदार नाईक यांनी सांगितले.