मुरुड : प्रतिनिधी
खैरा चणेरे भागात राहणारे सादिक खोत यांच्या घराच्या जोत्यामध्ये एका साडेचार फूट लांबीच्या नागिणीने वास्तव्य आढळून आले होते. काही दिवसांपुर्वी त्यांच्या घरातील व्यक्तींना या नागिणीचे दर्शन झाले होते. त्यामुळे कुटुंबातील सदस्य भीतीच्या छायेखाली वावरत होते. सादिक यांचे जवळचे नातेवाईक तुफेल दामाद यांनी मुरुडचे सर्पमित्र संदीप घरत यांना भेटून सदरच्या नागिणीपासून सुटका करण्याची विनंती केली होती.
त्यानुसार सर्पमित्र संदीप घरत यांनी या नागिणीला पकडून बरणीत भरले. त्यानंतर नागिणीला चणेरा परिसरातील जंगलात सुखरूपपणे सोडण्यात आले. या वेळी चणेरा वनपाल राजू क्षीरसागर, वनमजूर दिनेश सकपाळ, तुफेल दामाद, प्रमोद दिवेकर आणि डॉ. खोत आदी उपस्थित होते.