लंडन : वृत्तसंस्था
भारताने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली 1983 साली इंग्लंडमध्येच वर्ल्ड कप जिंकला होता. आता पुन्हा एकदा इंग्लंडमध्येच क्रिकेटचा वर्ल्ड कप भरवला जात आहे. त्यामुळे मिशन वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाने देशाला पहिला वर्ल्ड कप जिंकवून देणार्या कपिल देव यांची खास भेट घेतली.
भारत वर्ल्ड कप जिंकू शकतो, हे स्वप्न कपिल देव यांनी पहिल्यांदा सत्यात उतरवले. 1983 साली झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताने दिग्गज वेस्ट इंडिजला पराभूत केले होते. यापूर्वी झालेल्या दोन्ही वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजने बाजी मारली होती. त्यामुळे 1983 साली वेस्ट इंडिज विजयाची हॅट्ट्रिक साजरी करणार का, याकडे सार्यांचे लक्ष होते, पण भारताने वेस्ट इंडिजला पराभूत करत पहिल्यांदाच वर्ल्डकप पटकावला होता.
गुरुवारी खेळाडूंसाठी एका खास मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांनी खेस भेट घेतली. या वेळी बर्याच गोष्टी कपिल देव यांनी भारतीय खेळाडूंना सांगितल्या. या भेटीनंतर भारतीय संघाचे मनोबल उंचावल्याचे म्हटले जात आहे.