Breaking News

राज्यात महायुतीचे गतिमान सरकार -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पेण : प्रतिनिधी
आपली जी महायुती आहे ती गती आणि प्रगती आहे; तर महाविकास आघाडी म्हणजे स्थगिती आहे, अशा शब्दांत महायुती आणि महाविकास आघाडीमधील फरक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि. 12) पेण येथे स्पष्ट केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध लोकोपयोगी योजना राबवून राज्यात महायुतीचे सरकार गतिमान पद्धतीने काम करीत आहे. या सरकारला साथ देत महायुतीचे उमेदवार आमदार रविशेठ पाटील यांना निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांच्या प्रचारार्थ पेणमधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या सभेस सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, खासदार धैर्यशील पाटील, माजी आमदार अनिकेत तटकरे आदी उपस्थित होते.
आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबई आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा अटल सेतू मी तुम्हाला अगोदरच देऊ शकलो असतो, पण अडीच वर्षे नादान लोकांचे राज्य आले. त्यांनी खोडा घालत अटल सेतूची गती कमी केली, परंतु मला आनंद आहे आज पेण आणि मुंबईमधले अंतर काय आहे हे लोकांना समजत नाही. पेणमधून निघून मुंबईपर्यंत सुसाट येता येते, कारण अटल सेतू या ठिकाणी तयार झाला आहे. अटल सेतू हे गती आणि प्रगतीचे चांगले उदाहरण आहे.
याचप्रमाणे विरार-अलिबाग कॉरिडोअरच्या माध्यमातूनदेखील गती वाढणार आहे. कॉरिडोअर करताना काही प्रश्न आहेत, परंतु काळजी करू नका. आपल्या सरकारने कधीही शेतकर्‍यांची जमीन कवडीमोल भावाने घेतली नाही. पुढेही घेणार नाही. शेतकर्‍यांनी चिंता करण्याची गरज नाही. हे सरकार शेतकर्‍यांसोबत आहे. योग्य दर देऊनच जमीन घेतली जाईल.
आपण कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही श्री गणेशाने करतो. गणेशाची उपासना आणि आराधना तर पेणशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे पेणच्या मूर्तिकारांनी काळजी करायची गरज नाही. एवढी वर्षे अडचणीत येऊ दिले नाही. पुढेही अडचणीत येऊ देणार नाही. शेवटी महाराष्ट्र नाही, तर पूर्ण जगात पेणच्या मूर्ती आम्हाला श्री गणेशाचे दर्शन घडवतात. गणेशाच्या आशीर्वादाने तुमचे काम चालू राहील हा आमचा निश्चितपणे प्रयत्न असेल तसेच निवडणूक संपल्यावर बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांची सभा मंत्रालयात घेतली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. तामसी बंदर विकास, धरमतर जेट्टी विकास, गेट वे येथून वाहतूक सुरू करण्याचे काम येत्या काळात करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पाच वर्षांपूर्वी याच मैदानामध्ये आमदार रविशेठ पाटील यांच्यासाठी मते मागण्याकरिता आलो होतो. त्या वेळी समोर आमचे मित्र धैर्यशील पाटील होते, परंतु आज मला सर्वाधिक समाधान आहे की, माझे दोन्ही मित्र एका मंचावर आहेत. रविशेठ पाटील आणि धैर्यशील पाटील ही जोडी म्हणजे जसे देशात आणि राज्यात डबल इंजिन आहे तसेच पेणला डबल इंजिन मिळालेले आहे. आमदार आणि खासदार अशा प्रकारचे डबल इंजिन घेऊन आज तुम्ही या ठिकाणी काम करत आहात. मला एका गोष्टीचा आनंद आहे की, सातत्याने या भागाच्या विकासाकरिता आमदार रविशेठ पाटील आणि खासदार धैर्यशील पाटील झटत आहेत. त्यांना विकासनिधी कधीही कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी दिली.
या वेळी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, मागच्या काळात महायुती सरकारच्या माध्यमातून येथील भागाचा विकासाला गती देण्याचे काम एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, नागरविकास खाते, आरोग्यसेवा अशा अनेक माध्यमातून करण्यात आले आहे. ही सर्व कामे मतदारांपर्यंत पोहचवा तसेच होऊ घातलेल्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी बूथवर जास्तीत जास्त मतदान महायुतीचे उमेदवार आमदार रविशेठ पाटील यांना कसे होईल याची जबाबदारी पार पाडावी.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी, माझ्या निवडणुकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा या मैदानावर झाली होती. आजही तो योग आमदार रविशेठ पाटील यांच्या प्रचारावेळी जुळून आला असल्याचे नमूद केले. या भागातून रविशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप व घटक पक्षांनी मोठे मताधिक्क्य मला मिळवून देण्याचे काम केले असेच काम या निवडणुकीत होऊन माझ्यापेक्षा दुप्पट मताधिक्क्य मिळवून देण्याचे काम सर्व कार्यकर्ते करतील व रविशेठ मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
खासदार धैर्यशील पाटील यांनी विरोधकांचा समाचार घेताना काही लोक आता येऊन विकासाच्या बढाया मारत आहेत, पण त्यांनी आधी जनतेसाठी घाम गाळावा, तरच मते मागण्याचा अधिकार असणार आहे. यासाठी त्यांनी 23 तारखेनंतर कामाला लागावे, असा टोला लगावला. पेण हे मुंबईच्या जवळ आले असून अनेक बिल्डर, धनिकांचा डोळा येथील जमिनीवर असणार आहे. तेव्हा भूमिपुत्रांनी संघटित होणे गरजेचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले.
पेणच्या विकासात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासनिधी आणण्याचे काम करण्यात आले. पाणी व इतर प्रश्नही येत्या काळात मार्गी लागतील यासाठी महायुतीला भरघोस पाठिंबा द्या, असे आवाहन महायुतीचे उमेदवार आमदार रविशेठ पाटील यांनी केले.
माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी या निवडणुकीनंतर नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीमध्येही स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांसाठी नेत्यांनी एकत्रित राहावे, असे आवाहन केले.
भाजप सरचिटणीस अ‍ॅड. महेश मोहिते, माजी नगराध्यक्ष प्रितम पाटील, दिनेश खैरे, सीताराम कांबळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर भाजपचे ज्येष्ठ नेते सतिश धारप, जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, राजेश मपारा, सरचिटणीस मिलिंद पाटील, जि.प.च्या माजी अध्यक्ष अ‍ॅड. नीलिमा पाटील, अविनाश म्हात्रे, डी.बी. पाटील, प्रभाकर म्हात्रे, मंगेश दळवी, प्रकाश देसाई, गिरीश तुळपुळे, अनिरूध्द पाटील, उद्धव कुथे आदी उपस्थित होते, तर सभेला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply