Breaking News

नवी मुंबईवर सीसीटिव्हीची नजर

1500पैकी 702 सीसीटिव्ही कॅमेरे बसवले
मध्यवर्ती नियंत्रण कक्षाची आयुक्तांकडून पाहणी

नवी मुंबई ः बातमीदार
नवी मुंबई शहर सुरक्षीततेला बळकटी देणार्‍या सीसीटीव्ही प्रकल्पाच्या कामास सुरुवात झालेली असून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी शहर अभियंता संजय देसाई आणि अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्यासमवेत सीसीटीव्ही प्रणाली मुख्य नियंत्रण कक्षाची प्रत्यक्ष पाहणी करीत हा प्रकल्प अधिक परिपूर्ण व सर्वसमावेशक होण्याच्या दृष्टीने मौल्यवान सूचना केल्या.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 1500हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे संपूर्ण शहरभर बसविण्यात येत असून त्याचा मध्यवर्ती नियंत्रण कक्ष महापालिका मुख्यालयात पहिल्या मजल्यावर स्थापित करण्यात आला आहे. सध्या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 702 विविध प्रकारचे हायडेफिनेशन कॅमेरे बसविण्यात आले असून 63 कॅमेरे मुख्य नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आलेले आहेत. आयुक्तांनी मुख्य नियंत्रण कक्षाच्या भेटीमध्ये कॅमेरा लावलेल्या ठिकाणावरील सीसीटीव्ही छायाचित्रीकरण बारकाईने पाहिले. हे सर्व कॅमेरे हायडेफिनेशन असून आयुक्तांनी नियंत्रण कक्षाशी जोडलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांद्वारे झूम इन व झूम आऊट करून शहरात काही भागात सुरु असलेल्या हालचालींची पाहणी केली. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी 592 ठिकाणी खाबांकरिता काँक्रिटचा पाया तयार करण्यात आला असून 534 खांब उभारण्यात आलेले आहेत. आयुक्तांनी ही सर्व माहिती सविस्तर जाणून घेतली व कोणत्या भागातील कॅमेरे कार्यान्वित झालेले आहेत तसेच कोणत्या भागातील खांब बसवून झालेले आहेत याची विस्तृत
माहिती घेतली.
पोलीस विभागाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असे 96 इव्हिडन्स कॅमेरे हे 24 मुख्य ट्रॅफिक जंक्शनवर बसविण्यात येत असून 288 एएनपीआर म्हणजेच टोमॅटीक नंबर प्लेट रेक्गनेशन कॅमेरे देखील बसविण्यात येत आहेत. या एएनपीआर कॅमे-याव्दारे स्वयंचलीत पध्दतीने वाहनांवरील नंबर प्लेट वाचन करता येणार आहे. ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर सिग्नल तोडणा-या तसेच वाहतुकीच्या इतर नियमांचा भंग करणा-या वाहनचालकांच्या घरी थेट दंडात्मक चलन फोटोसह पाठविले जाणार आहे. 24 ट्रॅफिक जंक्शनवर पब्लिक अनाऊंसमेंट सिस्टीम बसविण्यात येत असून याव्दारे आपत्कालीन व्यवस्थेच्या दृष्टीने अत्यावश्यक क्षणी नागरिकांकरिता सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातून महत्वाच्या सूचना देणे शक्य होणार आहे.

महापालिका क्षेत्रात 540 स्थानांवर कॅमेरे
या प्रकल्पांतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 540 स्थानांवर विविध प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत असून 230 स्थानांवर कॅमेरे बसवून झालेले आहेत. त्यामध्ये शहरातील मुख्य चौक, बस डेपो, मार्केट्स, उद्याने, मैदाने, नाके, वर्दळीची ठिकाणे, नमुंमपा कार्यालये, पामबीच, ठाणे बेलापूर रोड, सायन पनवेल असे जास्त रहदारीचे रस्ते येथे हाय डेफिनेश कॅमेरे बसविण्यात येत आहेत. याशिवाय नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राला लाभलेला विस्तारित सागरी किनारा लक्षात घेऊन सागरी सुरक्षेच्या दृष्टीने नऊ थर्मल कॅमेरे बसविण्यात येत आहेत.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply