झुकू झुकू झुकू झुकू आगीनगाडी, धुराच्या रेषा हवेत सोडी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, हे गाणे मे महिन्यात सुटी पडली की बालगोपाळांच्या तोंडी हमखास असणारच, पण यावर्षी लोकसभेच्या निवडणुका आल्याने अनेकांना मामाच्या गावाला जायला मिळाले नाही. त्यामुळे एका नाराज झालेल्या कवीने तयार केलेले
झुकू झुकू झुकू झुकू आगीनगाडी, तोंडाच्या वाफा हवेत सोडी, पडती काँग्रेस पाहूया, पाहूया, राजांच्या सभेला जाऊया॥1 ॥
सभांना त्यांच्या नुसतीच गर्दी, नाही तेथे मतांची वर्दी, राजांच्या सभेला जाऊया॥2॥
काका मोठे तालेवार, दिल्लीची स्वप्ने पाहूया, राजांच्या सभेला जाऊया
हे गाणे मात्र अनेकांच्या तोंडी ऐकायला येत होते.
निवडणुकीपूर्वी बारामतीवाले शरदकाका म्हणाले होते की, सुप्रिया पडली तर आपला निवडणूक पध्दतीवरचा विश्वास उडेल. निवडणूक लढवण्यासाठी हाताची, कपबशीची आणि शिवाजी पार्कच्या इंजिनाचीही मदत घेतली तरी त्यांना पराभव होईल अशी भीती वाटल्यावर त्यांनी निवडणूक पध्दतीवर आणि ईव्हीएम मशीनवरचा आपला विश्वास उडेल असे जाहीर केले. आता आपल्या बारामतीकर शरदकाकांनी निवडणूक पध्दतीवर आणि ईव्हीएम मशीनवरचा विश्वास उडेल म्हटल्यावर प. बंगालच्या ममतादीदी आणि उत्तर प्रदेशातून मायावतीजीनेही त्यांची रि ओढली होती. मतदान झाल्यावर निकालापूर्वीच पंतप्रधानपदाची स्वप्ने काकांना पडू लागली होती. (झोपेतही ते ईश्वरसाक्ष खरे सांगेन, असे बडबडत असल्याचे समजल्याने दादा घाबरले होते, असे म्हणतात.) त्यामुळे त्यांनी सगळ्या विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू केला. चंद्राबाबूंपासून अखिलेश, ममता आणि मायावती सगळ्या आल्या. ’पहिले आप, पहिले आप’चा खेळ सुरू झाला आणि सत्तेची गाडी सुटून गेली. हवामान खात्याप्रमाणेच एक्झिट पोलचा अंदाजही खरा नसतो, असे ओरडत आणि सोनियाचा दिन आज आला म्हणत काका पप्पूची भेट घ्यायला दिल्लीत पोहचले.
चंद्राबाबू, ममता आणि माया यांचा अंदाज घेत असतानाच देशात एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरला. देशात मोदी त्सुनामी आली. या त्सुनामीने कमळ फुलले, तर काँग्रेस पडली नाही तर भुईसपाट झाली. माया, ममतांसह अनेक संस्थाने खालसा झाली. महाराष्ट्रात देवेंद्र आणि उध्दव यांच्या युतीने बाजी मारली. महाआघाडीचा धुव्वा उडाला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण स्वत:ची लाज राखू शकले नाहीत. दो हंसो का जोडामधील सुशीलकुमारांना सोलापुरी चादरीचे मार्केटिंग करण्यासाठी तेथेच ठेवण्याचा निर्णय सोलापूरकरांनी घेतला. मावळमध्ये रामाच्या मदतीने श्रीरंगाने पार्थचे पार्सल पुन्हा बारामतीला रवाना केले. बारामतीमध्ये सुप्रियाने लाज राखल्याने शरदकाकांनी ’ईव्हीएम मशीनवर आमचा भरवसा नाय, आमचा भरवसा नाय’ या गाण्याचे सूर आळवायचे बंद केले. राजांचे इंजीन धुरकट, वास येतो जळकट म्हणून जनतेने नाकारले. पप्पूचा चौकीदार चोर है, चोर है, ओरडून घसा बसला, पण अमेठीकरांनी त्याला दाद न देता पप्पूचे दातच घशात घातले.
त्यामुळे वधू संशोधन कार्यात आता अडथळा येणार असल्याने मामाच्या गावाला जाऊन त्यावर इलाज करण्याचे ठरवले. पप्पू लवकरच इटलीच्या मामाकडे जाणार असल्याची खबर आल्याने आता आपले कसे होणार म्हणून आदर्श अशोक चव्हाणांनी ’तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ काँग्रेस महान’ आळवायला सुरुवात केली आहे. दिल्लीत पप्पूचे आणि प. बंगालमध्ये ममतादीदींचे राजीनामानाट्य खेळून झाले. बारामतीत सुप्रिया निवडून आल्याने शरदकाका तोंडात लाडू भरून गप्प बसले होते. त्यामुळे अनेकांची पंचाईत झाली. बारामतीच्या दादांना मावळमधला पार्थचा पराभव चांगलाच झोंबल्याने त्यांनी पाणीटंचाई असली तरी धरण न भरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अलिबागच्या घशाला कोरड पडली. आता पुन्हा परिषदेवर संधी मिळेल का नाही या शंकेने त्रस्त झालेल्या अलिबागच्या डोमकावळ्याने हर्षदवर चोच मारून आपला शेतकर्यांचा आणि कामगारांचा कळवळा बेगडी असल्याचे दाखवून दिले.