पनवेल ः प्रतिनिधी
राजकारणाबरोबरच समाजकारणी म्हणून ज्यांची ओळख आहे, असे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यानिमित्ताने श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने 1 ते 10 जूनदरम्यान पनवेल महापालिका हद्दीत महास्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून पनवेल परिसर स्वच्छ केला जाणार असून, विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
एक दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना ओळखले जाते. सामाजिक बांधिलकी जपणारे नेतृत्व म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. गरीब-गरजूंना मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकी जपण्यात त्यांचा हातखंडा आहे. गेल्या तीन दशकांत त्यांनी राजकारणाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या नावाने श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. 2 जून रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस साजरा केला जातो. यंदा विकास मंडळाच्या वतीने पनवेल महापालिका क्षेत्रात महास्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. याकरिता येणारा सर्व खर्च श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ करणार आहे. रस्ते, गटारे, पदपथ 10 दिवसांत स्वच्छ करण्यात येणार आहेत. औषध फवारणी करून स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. यासाठी लागणारी मशिनरी, मनुष्यबळ, पावडर विकास मंडळाच्या वतीने पुरवण्यात येणार असल्याचे परेश ठाकूर यांनी सांगितले. पनवेल महानगरपालिका हद्दीत 20 प्रभागांचा समावेश आहे. त्यामध्ये समाविष्ट गावांचाही यात अंतर्भाव करण्यात आला आहे. यापुढील काळात स्वच्छतेवर भर देत हा परिसर कायम स्वच्छ ठेवण्यात येणार आहे. 1 जूनपासून सुरू होणार्या या अभियानात रोज विविध प्रभागांची स्वच्छता करण्यात येईल. यावर लक्ष देण्याची जबाबदारी मनपाचे आरोग्य निरीक्षक, नगरसेवक आणि पदाधिकार्यांवर सोपवण्यात आली आहे. पावसाळ्यात विविध आजारांचा संसर्ग होतो. त्यामुळे स्वच्छतेबद्दल काळजी घेणे गरजेचे असते. त्याअनुषंगाने महास्वच्छता अभियानात नागरिकांनी सहभागी होऊन ते यशस्वी करावे, असे आवाहन परेश ठाकूर यांनी केले. भाजपच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक नितीन पाटील, अनिल भगत, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे यांसह पदाधिकारी उपस्थित होते.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेच्या वतीने 2 जून रोजी रात्री 8 वाजता प्रसिद्ध गायक व निवेदक अंशुमन विचारे यांचा ’चाल तुरू तुरू’ हा गाण्यांचा व किश्यांचा संगीतमय हास्यकल्लोळ कार्यक्रम पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे. त्याचबरोबर शैक्षणिक वर्ष संपल्यामुळे अनेक जण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्या अनुषंगाने जॉब फेअरचे आयोजनही करण्यात येणार असल्याची माहिती या वेळी वाय. टी. देशमुख यांनी दिली, तसेच स्वच्छता अभियानांतर्गत पनवेल आणखी आकर्षक व्हावे यासाठी भिंती रंगविण्यात येणार असून त्या दृष्टिकोनातून सेल्फी पॉइंट स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती जयंत पगडे यांनी दिली.
– स्वच्छतेमुळे देशाचे आरोग्य राखण्यास मदत होते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान ही संकल्पना मांडली. त्यांच्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्राचाही हातभार लागत आहे. याच पार्श्वभूमीवर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल महापालिका हद्दीत महास्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. स्वच्छ पनवेल, सुंदर पनवेल, ही संकल्पना यानिमित्ताने वृद्धिंगत होईल, असा विश्वास वाटतो.
-परेश ठाकूर, सभागृह नेते, पनवेल महापालिका