Breaking News

कोंबडी चोरी करताना पाहिल्यामुळे विनयची हत्या

तीन आरोपी ताब्यात

पनवेल : वार्ताहर

पनवेल तालुक्यातील शिवकर येथे एका अल्पवयीन तरुणाची कुर्‍हाडीने हत्या केल्याची घटना घडली होती. पहाटेच्या सुमारास झालेल्या या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली होती. गुन्हे शाखा कक्ष तीनच्या पथकाने या अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीचा गुन्ह्याचा अखेर उलगडा केला असून कोंबडी चोरीसाठी आलेल्या आरोपींना विनय पाटीलने चोरी करताना पाहिल्यामुळे त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे.

या गुन्ह्यातील आरोपी दिनेशकुमार सरोज, वीरेंद्र कुमार सरोज, चंद्रशेखर लालजी हे तिन्ही आरोपी गुन्ह्याच्या दिवशी पहाटेच्या सुमारास गावात कोंबड्या चोरण्यासाठी आले होते. या वेळी ते विनयच्या घरात मोबाईल चोरण्यासाठी आले असता विनयला जाग आली. विनयला पाहून आरोपी पळू लागल्याने विनयनेदेखील त्यांच्या पाठोपाठ घरातून बाहेर पडत चोरांचा पाठलाग सुरू केला. यावेळी या तिन्ही चोरट्यांनी विनयला पकडले आणि पोटात चाकूने वार करून जखमी केले त्यानंतर कुर्‍हाडीने शरीरावर वार केला. यामध्ये विनयचा जागीच मृत्यू झाला. थोड्या वेळानंतर वडील आणि बहिणीला जाग आल्यानंतर त्यांनी मुलाचा शोध घेण्यास सुरू केला.

या वेळी त्यांना तलावाच्या गणपती घाटाजवळ विनयचा मृतदेह सापडला. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच घटनास्थळी वरिष्ठ अधिकार्‍यांनी भेट दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांची वेगळी पथके तयार करून आरोपीच्या शोधात परिसर पिंजून काढत होते.

दरम्यान, गुन्हे शाखा कक्ष 3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ कोळेकर व त्यांच्या पथकाने समांतर तपास सुरू करून त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्यातील तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पनवेल शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. याबाबत पुढील तपास पनवेल शहर पोलीस करीत आहेत.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply