मुंबईः प्रतिनिधी
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज (दि. 17) सुरुवात झाली. विधानसभेच्या कामकाजास वंदे मातरमने सुरुवात करण्यात आली. या वेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींसह मंत्री, राज्यमंत्री आणि विधानसभेचे सदस्य उपस्थित होते.
विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी विधानसभा सदस्य सर्वश्री सुरेश धानोरकर, प्रतापराव चिखलीकर, हर्षवर्धन जाधव, अनिल गोटे, जयदत्त क्षीरसागर, गिरीष बापट, राधाकृष्ण विखे पाटील, उन्मेश पाटील, हेमंत पाटील आणि इम्तियाज जलील यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतलेल्या नवनियुक्त मंत्र्यांचा परिचय करून दिला.
या वेळी गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर, शिक्षणमंत्री आशिष शेलार, कामगार मंत्री संजय कुटे, सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे, कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे, आदिवासी विकासमंत्री अशोक उईके, जलसंधारण मंत्री तानाजी सावंत, नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर, सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर, कामगार राज्यमंत्री संजय भेगडे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री डॉ. परिणय फुके आणि उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांचा मुख्यमंत्र्यांनी परिचय करून दिला आणि त्यांना शुभेच्छाही दिल्या. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी विधानसभेत तालिका अध्यक्षांची नियुक्ती विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली.
या वेळी सदस्य सर्वश्री सुधाकरराव देशमुख, संजय केळकर, शंभुराज देसाई, सुभाष साबणे, भारत भालके आणि संदीप नाईक यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. विधानसभेचे सदस्य, माजी सदस्य यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत शोकप्रस्ताव मांडून आदरांजली अर्पण करण्यात आली.
या वेळी दिवंगत सदस्य हनुमंत डोळस, माजी सदस्य रघुनाथ ओंकार उर्फ तात्यासाहेब आर. ओ. पाटील, पांडुरंग हजारे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्र्यांनी शोकप्रस्ताव मांडला. त्यावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, सदस्य सर्वश्री विजय वडेट्टीवार, अजित पवार, गणपतराव देशमुख, सतीश पाटील आणि किशोर पाटील यांनी भावना व्यक्त केल्या.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची काल सुरुवात झाली. यावेळी सभागृहात सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सभागृह नेते महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह सभागृहातील इतर सदस्य उपस्थित होते.
विधान परिषदेवर नवनिर्वाचित झालेले सदस्य पृथ्वीराज सयाजीराव देशमुख यांनीविधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी त्यांना शपथ दिली.
विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनाची आज सुरुवात झाली. सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी तालिका सभापतींची नियुक्ती सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी जाहीर केली. यात विधान परिषद सदस्य प्रविण दरेकर, डॉ. निलम गोर्हे, रामराव अडकुते आणि श्रीमती हुस्नबानो खलिफे यांचा समावेश आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज विधान परिषदेत सभागृह नेते महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवनिर्वाचित मंत्री यांचा सभागृहाला परिचय करून दिला.
– आज अर्थसंकल्प राज्याचा सन 2019-20चा अतिरिक्त अर्थसंकल्प उद्या (दि. 18) विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सादर होणार आहे. तत्पूर्वी सोमवारी वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार व वित्त आणि नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी अर्थसंकल्पावरून अखेरचा हात फिरवला.