मान्यवरांची उपस्थिती; नागरिकांनी लुटला आनंद
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मकरसंक्रांत सण रविवारी (दि. 15) मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्त पनवेल शहरातील मिडलक्लास हौसिंग सोसायटीच्या मैदानात पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. तसेच या महोत्सवाला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनीही भेट देत आयोजकांचे कौतुक करीत सर्वांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
या महोत्सवात लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी पतंग उडवण्याचा आनंद घेतला. ही परंपरा पुढे चालत रहावी म्हणून या ठिकाणी लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी रंगीबेरंगी तसेच कार्टून असलेले पतंग देण्यात आले. या वेळी लाईव्ह म्युुझिक, सेल्फी पॉईंट उभारण्यात आले होते. पतंग उडवताना लागणारा मांजा पक्ष्यांसाठी धोकादायक असल्याने या पतंग महोत्सवात मांजा वापरण्यास बंदी होती.
या महोत्सवास माजी नगरसेविका दर्शना भोईर, उद्योजक राजू गुप्ते, भाजपचे शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, स्वप्नील ठाकूर, सोसायटी मित्र मंडळाचे अध्यक्ष सुमित झुंझारराव, प्रशांत पोद्दार, उल्हास झुंझारराव, शेखर म्हात्रे, प्रशांत झुंझारराव, विजय शिंदे, संदीप पाटील, प्रवीण मोरबाळे यांच्यासह पदाधिकारी आणि नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.