नवी मुंबई ः प्रतिनिधी
बहुजनांचे कैवारी राजर्षी शाहू महाराज यांच्या 145व्या जयंतीचे औचित्य साधून बुधवारी (दि. 26) सायंकाळी 4 वाजता सत्याग्रह महाविद्यालयाच्या शांताबाई रामराव सभागृहात बिगर काँग्रेसी पंतप्रधानांनी अनुसूचित जाती-जमातींसाठी काय केले? या विषयावर गणराज्य अधिष्ठान संघटनेच्या वतीने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून, या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची विशेष उपस्थिती राहणार असल्याचे निमंत्रक प्रा. डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी सांगितले.
स्वातंत्र्यपूर्व काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शामाप्रसाद मुखर्जी यांनी पूर्वाश्रमीत अस्पृश्य तथा विद्यमान अनुसूचीत जाती-जमातीच्या बांधवाना समसमान संधी आणि दर्जाचा पुणे करार केला आहे. या कराराला 86 वर्षे पूर्ण झाली आहेत. या कराराच्या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा गांधी आणि त्यांच्या काँग्रेस पक्षाने काय साध्य केले याविषयी स्वतंत्र व्याख्यान देवून जनतेला अनुसूचीत जाती-जमातीच्या बाबतीतील भूमिका आणि अस्पृष्याशी केलेल्या कराराची चिरफाड केली.
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 1977 ते 2019 या काळावधीत मोरारजी देसाई, व्हि.पी. सिंग, अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी या बिगर काँग्रेसी पंतप्रधानांना देशातील जनतेने सत्तेची संधी दिली. सत्ता कोणाचीही असो आणि पक्ष कोणताही असो अनुसूचीत जाती-जमातीच्या समाज समुहाशी केलेल्या पुणे कराराची पुर्तता करणे संविधानिक बंधन आहे. त्यामुळे गणराज्य अधिष्ठान या संस्थेने बहुजनांचे राजे छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंतीदिनापासून ते हैद्राबाद मुक्तिसंग्राम 17 सप्टेंबर 2019 पर्यंत महाराष्ट्राच्या 8 प्रांतात विशेष व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. हया व्याखनमालेचे पहिले पुष्प प्रख्यात साहित्यिक अर्जुन डांगळे गुंफणार आहेत. गणराज्य अधिष्ठानचे सरचिटणीस तथा ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ हे या व्याख्यानमालेचे अध्यक्ष आहेत.
बिगर काँग्रेसी पंतप्रधानांनी अनुसूचीत जाती-जमातीसाठी काय-काय केले या विषयावरील व्याख्यानानिमित्त विशेष अतिथी म्हणून माजी खासदार रामशेठ ठाकूर यांना निमंत्रित करण्यात आले आहे, असे या व्याख्यानमालेचे निमंत्रक ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ.जी.के. डोंगरगावकर यांनी कळविले आहे. ही व्याख्यानमाला सर्वांसाठी खुली असून व्याख्यानमालेत मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन गणराज्य अधिष्ठानच्या पदाधिकार्यांनी केले आहे.