Breaking News

पाणीपुरवठ्याच्या तक्रारी दूर करा

सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे अधिकार्‍यांना निर्देश

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

सिडको वसाहतींमधील पाणीपुरवठ्यासंदर्भात अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 3) बैठक घेऊन आढावा घेतला. या वेळी त्यांनी पाणीपुरवठ्याविषयी नागरिकांच्या ज्या तक्रारी आहेत त्या दूर करा, असे निर्देश उपस्थित अधिकार्‍यांना दिले. 

सिडको भवनमध्ये झालेल्या बैठकीस स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, ‘ड’ प्रभाग समिती अध्यक्ष तेजस कांडपिळे, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, निलेश बाविस्कर, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक अशोक सिनगारे, अतिरिक्त मुख्य अभियंता धायटकर, पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता काळे, कार्यकारी अभियंता श्री. दलाल यांच्यासह सिडकोच्या विविध झोनमधील पाणीपुरवठा अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत पाणीपुरवठ्याविषयी सविस्तर चर्चा झाली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर अधिकार्‍यांना उद्देशून म्हणाले की, सिडको नोडमधील पाणीविषयक ज्या समस्या, तक्रारी असतील त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रत्यक्ष सोसायटी, इमारतींना भेटी द्या.

तत्पूर्वी तुम्ही तेथे कधी जाणार तो दिवस व वेळेची रहिवाशांना आधी कल्पना द्या, तसेच समस्या समजावून घेतल्यानंतर ती कधी मार्गी लागणार हेही सांगा.

आमदार प्रशांत ठाकूर पुढे म्हणाले की, प्रत्येक नागरिकाला पाणी मिळाले पाहिजे. त्या अनुषंगाने जिथे पाणीपुरवठा होत नसेल वा पाणी पुरत नसेल तिथे नियमाप्रमाणे टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा करा. विशेषत: नवीन पनवेलमध्ये वरच्या मजल्यांवर पाणी चढत नाही अशा ठिकाणी बुस्टर पंप वा तत्सम उपकरणे लावून तेथील रहिवाशांची पाण्याची गरज भागवा. याशिवाय काही ठिकाणी अनियमित पाणीपुरवठा होतो. त्यामुळे कुणाला अधिक, तर कुणाला कमी पाणी मिळते. तसे होऊ नये यासाठी आधुनिक यंत्रणा वापरून पाण्याचे समान वाटप करा.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply