Breaking News

खोपोलीत मुसळधार पावसाने रस्त्यावर पाणी

खालापुरात बळीराजा सुखावला

खोपोली : प्रतिनिधी

खालापुर व खोपोलीत गुरुवारी  सायंकाळपासून सुरू झालेल्या दमदार पावसाचा जोर शुक्रवारीही कायम राहिल्याने बळीराजा सुखावला आहे. मात्र या पहिल्याच पावसात शहरातील अनेक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याने खोपोली नगरपालिकेच्या कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. ‘गटारे दाखवा‘ असे आवाहन नागरिकांनी शुक्रवारी नगरपालिकेला केले.

दोन दिवसांपासून मधूनमधून पडणार्‍या पावसाने गुरुवारी रात्री व शुक्रवारी दमदार बॅटींग केली. या पावसाने चिंतेत सापडलेला बळीराजा सुखावला. मात्र शुक्रवारी पडलेल्या दमदार पावसाने खोपोली नगरपालिकेकडून करण्यात आलेल्या मान्सून पूर्व  कामांचे पितळ उघडे पडले. या पावसाने काही वेळातच खोपोली जलमय केली. शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर गुडघाभर पाणी साठल्याने   गटारे गायब झाली होती. अनेक भागात गटारातून पाण्याऐवजी कचरा ओसंडून बाहेर आल्याने नगरपालिका कोणत्या स्तराची कामे करते, ते उघड झाले. दरम्यान, काही भागात दरड कोसळल्याच्या  घटनेने नागरिकांत भीतीचे वातावरण दिसून आले. खंडाळा घाटात दाट धुक्यामुळे वाहने मंदगतीने जात होती. त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक मंदावल्याचे दिसून आले. खोपोली शहरातील सखल भागात पाणी साचले होते.

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply