Breaking News

बहुजन समाजाला एकत्र घेऊन आरक्षण मिळवायचे आहे -छत्रपती संभाजीराजे

कर्जत : बातमीदार

आम्हाला कोणाच्याही ताटातील काढून घ्यायचे नाही आणि सर्व बहुजन समाजाला सोबत घेऊन जायचे आहे, असे मत कर्जत येथील संवाद यात्रेत छत्रपती संभाजीराजे यांनी मांडले. शासनकर्ते ऐकणार नसतील तर मराठा आरक्षणासाठी लाँग मार्च काढला जाईल आणि पुण्यातून लाखो मराठा बांधव पायी चालायला लागतील, असे या वेळी छत्रपती संभाजीराजे यांनी जाहीर केले.

मंगळवारी (दि. 26) छत्रपती संभाजीराजे यांचा कर्जत तालुका संवाद दौरा आयोजित करण्यात आला होता. मराठा समाजाच्या तरुणांना शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळावे यासाठी पुकारलेली संवाद यात्रा कर्जत तालुक्यात आली. कर्जत तालुक्यातील संवाद दौर्‍याची सुरुवात पळसदरी येथील स्वामी समर्थ मठ येथून झाली.तेथून महाराजांची संवाद यात्रा कर्जत तालुक्यात आली, कर्जत चारफाटा येथे या संवादयात्रेचे स्वागत करण्यासाठी कर्जत तालुक्यातील जनसागर लोटला होता. पुढे छत्रपती संभाजीराजे हे कर्जत शहरातील डेक्कन जिमखाना येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे पोहचले.

या संवाद यात्रेत रायगड जिल्ह्याचे समन्वयक सुनील पाटील, विनोद साबळे, धनंजय जाधव, करण गायकवाड, तसेच कर्जत तालुक्यातील राजेश लाड, अनिल भोसले, मधुकर घारे, ज्ञानेश्वर भाळीवडे, प्रथमेश मोरे, किरण ठाकरे, प्रदीप ठाकरे, जगदीश ठाकरे आदींसह सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते सोबत होते. कर्जत तालुका संवाद यात्रेचा समारोप किरवली येथील शेळके हॉल येथे सभेने झाला.

छत्रपती संभाजीराजे यांनी सुरुवातीलाच सकल मराठा समाजाचे समन्वयक यांचे कौतुक केले. रायगड जिल्ह्यातील या संवाद यात्रेने मला रायगड पूर्ण पाहता आला, रायगड जिल्ह्यात ही ताकद सकल मराठा समाजाच्या समन्वयक यांनी यशस्वी केला असून मी केवळ निमित्त आहे. शासन केवळ घोषणा करीत असून मराठा आरक्षण उपसमितीकडून मराठा समाजातील जनतेची फसवणूक करीत आहे. शासन यापुढे देखील मराठा आरक्षणाबाबत फसवणूक करणार असेल, तर आम्ही लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून चालत मुंबईकडे निघणार आणि शासनाकडून भांडून आरक्षण घेणार, असे या वेळी जाहीर केले.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply