रायगड जिल्ह्यात आढळलेला पहिला प्रौढ पक्षी
पाली ः प्रतिनिधी
रायगडातील मुरूड येथील कोर्लई समुद्रकिनारी लाईट हाऊसजवळ दुर्मिळ मास्कड बुबी लेेलू (मोठा समुद्री कावळा) पक्षाचे दर्शन झाले. रायगड जिल्ह्यात बहुदा पूर्ण वाढ झालेला हा पहिला पक्षी दिसला असण्याची शक्यता पक्षी व वन्यजीव अभ्यासकांनी वर्तवली आहे.
अलिबाग येथील वन्यजीव अभ्यासक आणि वन्यजीव रक्षक डॉ. प्रसाद दाभोळकर यांनी सांगितले की, त्यांना कोर्लई येथून काही पर्यटकांनी फोन करून सांगितले की, येथे एक वेगळा पक्षी दिसत असून तो आजारी किंवा दमलेला वाटत आहे. काही हौशी पर्यटक या पक्षाला उचलून घेत आहेत, तर काही सेल्फी काढत आहेत. त्यांनी या पक्षाचा फोटो डॉ. प्रसाद दाभोळकर यांना पाठवला, डॉ. दाभोळकर यांनी हे फोटो लागलीच पक्षी अभ्यासक शंतनु कुवेसकर यांना पाठवले आणि हा पक्षी दुर्मिळ मास्कड बुबी (मोठा समुद्री कावळा) असल्याची खात्री केली. त्यानंतर त्यांनी त्वरीत मुरूड येथील वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियांका पाटील यांना याबाबत कळवले. प्रियांका पाटील यांनी वनरक्षक भगवान पिंगळे यांना लगेच जागेवर पाठविले मात्र तो पर्यंत हा पक्षी तेथून निघून गेला होता.
डॉ. प्रसाद दाभोळकर यांनी सांगितले की हा दुर्मिळ समुद्री पक्षी आहे. कदाचित रस्ता भरकटुन येथे किनारी आला असावा. स्ट्रेस (थकवा) निघून गेल्यावर तो तेथून निघून गेला असावा.
मास्कड बुबी म्हणजेच मोठा समुद्री कावळा या पूर्ण वाढीच्या पक्ष्याची रायगडच्या समुद्री किनार्याहून बहुदा पहिलीच छायाचित्रित नोंद असावी. बुबी हे पक्षी किनार्यापासून खूप दूर उष्णकटिबंधीय महासागरामध्ये राहणे पसंत करतात. फक्त प्रजनन काळातच हे पक्षी जमिनीवर तेही समुद्री बेटे व किनार्याजवळील उंच कड्यांमध्ये घरटी करणे पसंत करतात.
-शंतनु कुवेसकर, वन्यजीव अभ्यासक, माणगाव
अशा प्रकारचा पक्षी जर कोणाला दिसून आला तर त्यांनी त्वरीत वनविभागाला कळवावे, तसेच अशा दुर्मिळ पक्षासोबत सेल्फी काढू नये व त्याला हाताळूदेखील नये.
-प्रियांका पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी, मुरूड