नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त
सोमवारी (दि. 8) पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तुर्भे एमआयडीसीमधील बोनसरी गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गावालगतचा नाला तुंबल्याने त्यामधून वाहणारे पाणी रहिवाशी भागात शिरले. यामुळे तिथल्या रहिवाशांच्या स्थलांतराच्या हालचाली प्रशासनाकडून
सुरु आहेत.
नवी मुंबई परिसरात सोमवारी सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे शहरातील नाले ओसंडून वाहत आहेत. या नाल्यांच्या मार्गात काही ठिकाणी अडथळे निर्माण झाल्याने त्यामधील पाणी रस्त्यांवरून वाहत आहे. तर काही ठिकाणी रहिवाशी भागात पाणी शिरले आहे. अशाच प्रकारातून तुर्भे एमआयडीसी येथील बोनसरी गावात सकाळपासूनच पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तिथल्या नाल्याने पाण्याची पातळी ओलांडल्याने नाल्याला नदीचे स्वरूप आले आहे. घरांमध्ये सुमारे दोन फुटापर्यंत पाणी साचले आहे.