पोखरण : वृत्तसंस्था – नाग या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राचा लवकरच लष्कराच्या ताफ्यात समावेश होईल. रविवारी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) पोखरण फायरींग रेंजवर नाग क्षेपणास्त्राच्या तीन यशस्वी चाचण्या घेतल्या. रविवारी दिवसा आणि रात्री दोन्ही वेळा नाग क्षेपणास्त्र डागून चाचणी घेण्यात आली. तिन्ही चाचण्या यशस्वी ठरल्याचे डीआरडीओच्या अधिकार्यांकडून सांगण्यात आले.
नाग क्षेपणास्त्र लष्कराच्या ताफ्यात समावेश होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. डीआरडीओने विकसित केलेल्या नाग क्षेपणास्त्राची 524 कोटी रुपयांना खरेदी करण्याच्या प्रस्तावाला डीएसीने मागच्या वर्षीच मंजुरी दिली आहे. नाग ही तिसर्या पिढीची रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र यंत्रणा आहे. क्षेपणास्त्र वाहून नेणारे वाहनही या सिस्टिममध्ये आहे.
दिवसाच नव्हे तर रात्रीच्या वेळीसुद्धा शत्रू देशाचे रणगाडे उद्ध्वस्त करण्याची नागमध्ये क्षमता आहे. नागच्या समावेशाने भारतीय लष्कराची हल्ला करण्याची क्षमता वाढणार आहे. 1980च्या दशकात भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाच क्षेपणास्त्र विकसित करण्याची योजना बनवण्यात आली होती. नाग त्यापैकी एक आहे. अग्नी, पृथ्वी आणि आकाश ही क्षेपणास्त्रसुद्धा याच कार्यक्रमांतर्गत विकसित करण्यात आली आहेत.