गेली काही वर्षे दुष्काळाचा सामना करणार्या महाराष्ट्रातील मोठ्या प्रदेशाला यंदा ओला दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. मुंबई नजीकचा कल्याण, बदलापूर परिसर असो, पालघर, वसई किंवा पनवेलच्या नजीकचा परिसर नद्यांमधील पाण्याची पातळी अतिवृष्टीमुळे अकस्मात वाढल्याने नद्यांलगतच्या गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला.
गेला आठवडाअखेर आणि त्याआधीच्या आठवड्यातले काही दिवसही राज्यात पावसाने मोठे थैमान घातले. विशेषतः उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राला या काळात अतिवृष्टीने चांगलेच झोडपून काढले. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने या परिसरात अतिवृष्टीची शक्यता असल्याचे केंद्रीय हवामान विभागाने वेळीच घोषित केलेच होते. शासकीय यंत्रणेने वेगाने निर्णय घेऊन मोसमातील सर्वाधिक उंचीच्या भरतीच्या लाटा येणार असल्याची माहिती सुयोग्य वेळेत लोकांपर्यंत पोहोचवली. त्यामुळे शनिवारी मोठ्या प्रमाणात लोकांनी घरीच थांबणे पसंत केले. सोमवारीदेखील शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्याचा निर्णय पालकांना दिलासा देऊन गेला. नैसर्गिक घटनांवर आपले नियंत्रण नसले, तरी संबंधित परिस्थितीचे सुनियोजन केल्यास नुकसान कमीत कमी ठेवता येऊ शकते हे या काळात पाहायला मिळाले. अर्थातच ज्यांच्या घरांमध्ये पाणी शिरले किंवा ज्यांच्या शेतातील पिके पाण्याखाली गेली, त्यांना या पावसाच्या दुष्परिणामांना तोंड द्यावेच लागले. कसोटी पाहणार्या या काळातच, मुंबईला पाणीपुरवठा करणार्या बहुतेक जलाशयांमध्ये पुढील वर्षभरात पुरू शकेल इतका पाणीसाठा जमा झाल्याची आनंदवार्ताही मिळाली. अर्थातच, अनेक शहरां-गावांतील नागरिकांना पूरसदृश स्थितीचा सामना करावा लागत असल्याच्या चिंताजनक परिस्थितीची जाणीव असल्यामुळे या आनंदवार्तेचे सुख फारसे कुणाला साजरे करता आले नाही. पाणी साचून काही काळासाठी वाहतुकीची कोंडी तर अशा अनेक भागांमध्ये लोकांना अनुभवावी लागली. अल्पकाळात मोठी पर्जन्यवृष्टी झाल्याचा हा परिणाम होता. ठिकठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी ही आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी कौशल्य पणाला लावलेच, परंतु नेहमीप्रमाणे स्थानिक नागरिकांनीही परस्परांना सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेतल्यामुळे पावसाचे प्रमाण खूपच अधिक असूनही जीवितहानी टाळण्याचे प्रयत्न यशस्वी ठरले. नेहमीच्या रस्त्यांवरून सवयीने जाणारी गुरे मात्र काही ठिकाणी पुराच्या पाण्यात सापडून बुडाली. त्या निष्पाप जीवांना असहायपणे एका मागोमाग एक बुडताना पाहणे अनेकांना व्यथित करून गेले. नद्यांमधील पाण्याची पातळी वाढल्याच्या सूचना सर्व ठिकाणी लगतच्या गावांना वेळेत पोहोचवण्यात आल्या, मात्र त्यासोबतच अकस्मात येणार्या पाण्याच्या लोंढ्याची माहिती सर्वदूर पोहोचवून लोकांना सावध करण्याच्या यंत्रणा आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने अधिक विकसित केल्या जाण्याची गरज आहे. यासाठी पाटबंधारे विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था व अन्य संबंधित यंत्रणांना परस्पर सहकार्याने काम करावे लागेल. तूर्तास उपलब्ध समाजमाध्यमांचा वापर करून शासकीय यंत्रणा व लोक खबरदारी घेत असल्याचे मोठ्या प्रमाणात आढळून आले. मदतीचा हात पुढे करण्यातही समाजमाध्यमांचा उपयोग होताना दिसून आला. अनेक ठिकाणी धरणांचे दरवाजे उघडण्यात आले. तिथे-तिथे सरकारी यंत्रणांनी उत्तम नियोजन करून परिस्थिती कौशल्याने हाताळली.