कर्जत : प्रतिनिधी
कर्जत शहरात राहणारा 22 वर्षीय गणेश सुभाष लोवन्सी हा एका भाजी विक्रेत्याचा मुलगा सैन्यदलात भरती झाला आहे. तो नुकताच नाशिक येथील प्रशिक्षण संपवून कर्जतमध्ये आला. त्याचे नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. गेल्या चार दिवसांत तालुक्यातील हा दुसरा तरुण आहे, ज्याची सैन्यदलात निवड झाली.
गणेश हा मूळचा मध्य प्रदेशातील इंदोरचा, परंतु त्याच्या तीन पिढ्या कर्जतमध्येच वास्तव्यात आहेत. गणेशचे बारावीपर्यंतचे शिक्षणही येथेच झाले. त्याचे वडील सुभाष आणि आई दुर्गा भाजी विक्रेते आहेत. गणेशला शालेय जीवनापासूनच लष्करातील जवानांबद्दल आकर्षण होते. त्यामुळे आपण सैन्य दलात भरती होऊन देशाची सेवा करावी असे त्याने तेव्हाच मनाशी ठरविले होते आणि त्याला त्यासाठी आई-वडिलांनी पूर्ण पाठिंबा दिला.
गणेशची नियुक्ती गुजरातमध्ये झाली आहे. तो 1 फेब्रुवारी रोजी आपल्या पहिल्या पोस्टिंगवर रूजू होणार आहे. कर्जत शहरात येताच गणेशचे कर्जतकरांनी स्वागत आणि अभिनंदन केले. त्यानंतर त्याची निवासस्थानापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.
कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यतील युवकांचा ओढा सैन्यदलात जाण्याकडे असतो. त्याप्रमाणे रायगड जिल्ह्यातील विशेषतः आपल्या तालुक्यातील युवकांनीही सैन्यात जाऊन देशाची सेवा करावी. माझ्या या यशाचे श्रेय आई-बाबा आणि माझे गुरू दया शितोळे यांना जाते.
-गणेश सोलंकी, नवनियुक्त सैनिक