Breaking News

पोलादपुरात वृक्ष कोसळून वाहने, दुकानांचे नुकसान

पोलादपूर : प्रतिनिधी

मुसळधार पावसामुळे मंगळवारी

(दि. 6) पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास पोलादपूर पंचायत समिती कार्यालयासमोरील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाकाय वृक्ष कोसळून एक झायलो गाडी, तीन मोटारसायकली आणि दोन दुकानांची हानी झाली. वृक्ष कोसळल्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही तास ठप्प झाली होती.

या घटनेत महावितरणच्या विद्युत रोहित्राचीही हानी झाल्याने काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता. दरम्यान, महामार्गावरील छोट्या वाहनांची वाहतूक पोलादपूर बाजारपेठेतून, तर मोठ्या वाहनांची वाहतूक महाड राजेवाडी विन्हेरेमार्गे वळविण्यात आली होती. राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचा आपत्ती निवारण विभाग, पोलादपूर पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने कोसळलेल्या झाडांच्या फांद्या व खोड वेगवेगळे करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली, तसेच वीजपुरवठादेखील सुरळीत करण्यात आला. 

– दरड कोसळण्याचे सत्र सुरूच पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटामध्ये सोमवारी कोसळलेली दरड हटवण्याचे काम सुरू असताना अचानक दाभिळ गावाच्या नामफलकाजवळील डोंगरातून मातीचा ढिगारा आणि मोठमोठे दगड रस्त्यावरून दरीपर्यंत कोसळल्याने हा घाटरस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद झाला. रात्री उशिरा ही दरड हटवण्याचे काम पूर्ण करण्यात आले. पोलादपूर नगरपंचायत हद्दीतील सावंतकोंड-पार्टेकोंड रस्त्यावरही सोमवारी दरड कोसळून काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply